पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुनीत बालन ग्रुपतर्फे पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या फ्रेंडशिप करंडक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत विविध मंडळांचे १६ निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. याचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता होणार आहे.
पुण्यातील गणपती मंडळातील कसबा गणपती मडळ, श्रीमंत दगडुशेठ हलवाई मंडळ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरूजी तालिम मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, गरूड गणपती मंडळ या गणपती मंडळांसह नवरात्र मंडळातील श्री साई मित्र मंडळ, श्री महालक्ष्मी मंदिर तसेच ढोल ताशा वाद्य या पथकांमधील युवा वाद्य पथक, श्रीराम पथक, नादब्रह्म या सर्ववादक तसेच पत्रकारांचा मीडिया संघ, अशा गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, वाद्य पथक आणि मीडिया क्षेत्रातील क्रिकेट संघांचा स्पर्धेत समावेश आहे.
या स्पर्धेचे सामने सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर होणार आहेत. साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या स्पर्धेत १६ संघांपैकी अव्वल आठ संघ बाद फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत.
विजेत्या संघाला तब्बल दोन लाख ११ हजार रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला एक लाख ११ हजार रुपये आणि करंडक असे पारितोषिक मिळणार आहे.
स्पर्धेतील मालिकावीर खेळाडूला ५१ हजार रुपये आणि इलेट्रिक बाइक देण्यात येणार आहे. याबरोबरच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी २१ हजार रूपये आणि सन्मानचिन्ह, फेअर प्ले पुरस्कार जिंकणाऱ्या संघाला ११ हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. तसेच सामनावीर खेळाडूला रोख पाच हजार रूपये अशी बक्षीसे दिली जाणार आहेत.
सार्वजनिक गणपती आणि नवरात्र मंडळ यांच्यासह वाद्य पथक आणि मीडिया समावेश असलेली ही नावीन्यपूर्ण क्रिकेट स्पर्धा ठरणार आहे. स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरीच यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
स्पर्धेचा हा सलग तिसरा मौसम आहे. गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणाऱ्या ‘मीडिया’ असे १६ निमंत्रित संघ या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतात आणि हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे,. – पुनीत बालन, संचालक, पुनीत बालन ग्रुप
या संघांचा सहभाग
गुरूजी तालीम टायटन्स्, महालक्ष्मी मारव्हिक्स्, मंडई मास्टर्स, कसबा सुपर किंग्ज्, गरूड स्ट्रायकर्स, साई पॉवर हिटर्स, दगडुशेठ वॉरीयर्स, रंगारी रॉयल्स्, तुळशीबाग टस्कर्स, जोगेश्वरी जॅग्वॉर्स, नादब्रह्म ड्रमर्स, श्रीराम पथक, नादब्रह्म सर्ववादक, शिवमुद्रा ढोल ताशा, युवा योद्धाज् आणि मीडिया रायटर्स असे १६ निमंत्रित संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.