पुणे: मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागानंतर फुल बाजार सुरू करण्यास बाजार समिती प्रशासनाला यश आले आहे. तब्बल 90 दिवसांपासून बंद असलेला हा विभाग येत्या गुरूवारपासून (दि.18) सुरू होणार आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नेहमीच्या तुलनेत निम्मे आडते कार्यरत राहणार असून, विषम क्रमांकाचे एक दिवस, तर दुसऱ्या दिवशी सम क्रमांकाच्या आडत्यांना व्यापार करता येणार असल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तु नसल्याने सर्वात आधी मार्केट यार्डातील फुल बाजार 19 मार्चपासून बंद करण्यात आला होता. त्यानंतर 10 एप्रिलपासून बंद झालेला फळ, भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभाग 31 मेपासून सुरू झाला. त्यानंतर फुल बाजार सुरू करण्याची मागणी आडते आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर आडते आणि बाजार बाजार समिती प्रशासनाच्या झालेल्या बैठक झाली.
या बैठकीत बाजार सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्का झाला. बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख, फुलबाजार आडते आणि व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड, अखिल फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर, आडते आणि व्यापारी संघटनेच उपाध्यक्ष हरिभाऊ कामठे, अंकुश शेलार, राजू मोहिते, नाना जगताप, किरण जगताप आदी उपस्थित होते.