न्हावरे (प्रतिनिधी) :- आलेगाव पागा (ता.शिरूर) येथील रेशनिंग दुकानातील डाळींच्या घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर कारवाईच्या भीतीने दुकान चालवत असलेल्या बचत गटाच्या अध्यक्षा व सचिव यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचा रेशनिंग दुकानाचा परवाना रद्द झाला आहे.
यशोदा महिला बचत गट हे आलेगाव पागा येथील रेशनिंग दुकान चालवत होते. मात्र, ५ जून रोजी महसूल विभागाने येथील ग्राहकांच्या तक्रारीवरून रेशनिंग दुकानाची दप्तर तपासणी केली होती. त्यामध्ये रेशनिंग दुकानात डाळींचा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महसूल विभागाने तब्बल १५ जून पर्यंत केलेल्या चौकशीमध्ये रेशनिंग दुकानात डाळींच्या घोटाळ्याप्रकरणी आलेगावात जाऊन रेशनिंग कार्ड धारक ग्राहकांचे जबाब घेतले. त्यामध्ये डाळींचा घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे संबंधित रेशनिंग दुकान चालवत असलेल्या यशोदा महिला बचत गटावर कायदेशीर कारवाई होणार हे स्पष्ट असतानाच कारवाईच्या भीतीने यशोदा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सिंधू संजय बेनके आणि सचिव मंगल तुकाराम बेनके यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई टळली असली तरी दुकानाचा परवाना रद्द झाला आहे. असे शिरूरचे नायब तहसीलदार (महसूल) ज्ञानदेव यादव यांनी सांगितले.