पुणे – शहारात विविध ठिकाणी गर्दीने फुललेले रस्ते, गुलाबी थंडीत मित्र-मैत्रिणी, कुटुंबीयांसमवेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जमलेले नागरिक, मनपसंत खाद्यपदार्थ, संगीत आणि खरेदीचा आनंद घेत आणि रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले “काऊंटडाउन’ आणि घड्याळात बाराचा ठोका पडताच झालेला “हॅपी न्यू इयरचा’ जल्लोष… अशा उत्साही वातावरणात पुणेकरांनी बुधवारी मध्यरात्री नववर्षाचे स्वागत केले.
नागरिकांनी मित्र-मैत्रिणी आणि परिवारासह सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. विशेषत: कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, कॅम्पसह जंगली महाराज रस्ता, फर्गसन रस्ता तरुणाईच्या गर्दीने फुलला होता. अनेक ठिकाणी “न्यू इयर पार्टी’चे आयोजन केले होते. यासह हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती.
हॉटेल्सच्या बरोबरीने नागरिकांचा “ऑनलाइन’ ऑर्डर देण्याकडे कल होता. विविध ठिकाणी तरूणाईने “डीजे’च्या तालावर थिरकत आनंद लुटला. परंतु “वीक डे’मध्ये “सेलिब्रेशन’ करावे लागल्याने अनेकांच्या आनंदावर काही अंशी विरजण पडले.
सायंकाळनंतर “सेलिब्रेशन’ करण्यासाठी सगळीकडे गर्दी झाली. रंगेबेरंगी फुगे आकाशात सोडत, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत, मित्र-मैत्रिणींसह साजरा आनंद साजरा केला. रात्री बाराच्या ठोक्याला विविध ठिकाणी आतषबाजी झाली. अनेकांनी सेलिब्रेशन करतानाचे फोटो, सेल्फी फेसबुक, इन्टाग्राम, व्हॉट्सऍप आदी माध्यमांवर शेअर केले.