पुणे -गोड्या पाण्यात आढळणाऱ्या अल्बिनो भारतीय मृदुकाय कासवाची (इंडियन फ्लेप शेल टर्टल) पुण्यातील औंध येथे नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, असे कासव राज्यात 92 वर्षांनंतर आढळले आहे.
पुण्यातील अलाइव्ह या संस्थेतील वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला आणि सर्पमित्र राजेंद्र कांबळे यांनी या कासवाची नोंद केली आहे. यासंदर्भातील शोधनिबंध “झु’ज प्रिंट’ या आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. यासाठी झुलोजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनिल महाबळ यांनी मार्गदर्शन केले.
वाघेला म्हणाले, या दुर्मीळ कासवाची प्रथम नोंद सन 1928 साली नागपूर येथे झाली. त्यानंतर असे कासव हिम्मतनगर-गुजरात, चेन्नई, कोझिकोड-केरळ अशा मोजक्या ठिकाणी आढळले आहेत. जुलै 2019 मध्ये औंध येथे आढळलेले हे कासव महाराष्ट्रात दुसऱ्यांदा 92 वर्षांनंतर आढळले आहे. या नोंदीची दखल विज्ञानपत्रिकेत घेण्यात आली.
अल्बिनो कासव संपूर्ण पिवळसर पांढरे असल्यामुळे ओळखणे कठीण असते. हे मिश्राहारी असून पाणवनस्पती, गोगलगाई, कोळंबी आणि मासे याचे अन्न आहे.”वन्यजीवांच्या अनेक प्रजातींमध्ये एखादा असा जीव क्वचित सापडतो. पांढऱ्या रंगामुळे शत्रूच्या नजरेत त्वरित येत असल्यामुळे ती कमी आयुष्य जगतात. या कासवाची शिकार केली जाते. त्यांना वाचवण्याची आवश्यकता आहे.’