पुणे -राज्यात सध्या पावसासाठी प्रभावी हवामान परिस्थिती नाही. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात जुलैपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नाही. मात्र, जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यातील बहुतांश भागात गेल्या आठवडाभरापासून पावसाचे प्रमाण घटले आहे. पुणे आणि परिसरातही दिवसभर ढगाळ वातावरण असूनही, पावसाची हजेरी लागलेली नाही. तर बहुतांश ठिकाणी “मान्सून’ने विसावा घेतला आहे.
विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनूपम काश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सध्या राज्यात मान्सूनसाठी प्रभावी परिस्थिती नाही. त्यामुळे पुढील आठवडाभर बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमीच राहणार आहे. सद्यस्थितीत हवामानाची टर्फलाइन उत्तरप्रदेश-ईशान्य भारत-बंगाल-झारखंड या पूर्वेकडील राज्यांमधून जात आहे.
त्यामुळे विदर्भ भागात काही प्रमाण वाऱ्यांनी बाष्प खेचून आणले आहे. तर, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीच्या प्रभावामुळे कोकणात पुढील दोन दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, जुलैमध्ये मान्सून पुन्हा प्रभावी होण्याची शक्यता आहे.