पुणे – करोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे पुणे, नगर आणि नाशिक कार्यक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दिलासा दिला आहे.
शनिवारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद बैठक झाली. यात सर्वच विषयावर वेळेअभावी निर्णय होऊ शकले नाहीत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात ही बैठक होणार आहे. तत्पूर्वी परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी “करोना संसर्गामुळे ज्यांचे आई-वडिल मृत्यू पावले आहेत, या विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करावे,’ असा प्रस्ताव मांडला. तो बैठकीत मान्य करण्यात आला.
दरम्यान, सध्या विद्यापीठाच्या द्वितीय सत्र परीक्षेचे नियोजन सुरू आहे. यासाठी विद्यार्थी शुल्कासह अर्ज करत आहेत. परीक्षा अर्ज भरण्याची मुदत दि. 27 जूनपर्यंत आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. काही जण अर्ज करत आहेत.
अशा स्थितीत करोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. ज्यांनी शुल्क भरले असेल, तर ते परत दिले जाणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अशा विद्यार्थ्यांची नेमकी संख्या किती आहे, त्याची माहिती संकलित करण्यात येत आहे.