पुणे विद्यापीठाचे प्रथम सत्र परीक्षा 11 एप्रिलपासून

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रथम सत्र परीक्षा 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे. प्रथम सत्र ते अंतिम वर्षाच्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल चॉइस क्वेश्‍चन- एमसीक्‍यू) पद्धतीने 50 गुणांची ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठाची स्वतःची असलेल्या “एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशन’ या कंपनीमार्फत परीक्षा होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

नियोजित वेळापत्रकानुसार दि. 15 मार्चपासून परीक्षा सुरू होणार होती. मात्र, एजन्सी नेमण्यावरून परीक्षा कधी होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक आज झाली. यात परीक्षेच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे अखेर विद्यापीठावर एक महिना ही परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आली.

साधारणत: दोन तास चाललेल्या बैठकीत दोन्ही सत्राची परीक्षा एकत्र घ्यावी का?, परीक्षा कोणती एजन्सी घेणार?, परीक्षेमध्ये गुणवत्ता राखण्यासाठी काय केले जाणार यासह अन्य विषयांवर जोरदार चर्चा झाली. एसएसपीयू एज्युटेक फाउंडेशनने परीक्षा घेण्याची तयारी दर्शविल्याने पत्रही बैठकीस सादर करण्यात आले. या कंपनीची क्षमता आहे का? यावरही चर्चा करण्यात आली. तसेच यापूर्वीच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा 50ः20 या पॅटर्ननुसार घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशा पद्धतीने ही परीक्षा घेण्याची क्षमता या कंपनीची नसल्याने 50ः20 हा पॅटर्न रद्द करण्यात आले आहे.

प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष या सर्वांची सरसकट 50 गुणांची एमसीक्‍यू परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी 10 मार्चपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. आतापर्यंत 5 लाख 84 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत. जवळपास 6 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी अपेक्षित आहे. ह्या परीक्षेसाठी 10 मार्चनंतर कसल्याही परिस्थितीत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी माहिती विद्यापीठातर्फे देण्यात आली.

विद्यापीठाची प्रथम सत्र परीक्षा 11 एप्रिलपासून सुरू होईल. त्याचे वेळापत्रक 20 ते 25 मार्च दरम्यान जाहीर होईल. या परीक्षेत 50ः20 पॅटर्न रद्द करण्यात आला आहे. सर्व अभ्यासक्रमांच्या व सर्व वर्षांच्या परीक्षा 50 गुणांची एमसीक्‍यू पद्धतीने होणार आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.