मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आज भल्या पहाटे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मलिकांवर ईडीने चौकशी लावल्यानंतर राष्ट्रवादीने प्रतिक्रिया दिली आहे. ”नवाब मलिक यांच्यावरील कारवाई म्हणजे सत्तेच्या दुरुपयोगाचा अजून एक प्रकार आहे.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
राज्यातील एका अत्यंत जबाबदार मंत्र्यांना केंद्रीय यंत्रणेकडून अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील वर्तन आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 23, 2022
जयंत पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावरील कारवाई म्हणजे सत्तेच्या दुरुपयोगाचा अजून एक प्रकार आहे. ज्या व्यवस्थेमधील त्रुटी नवाब मलिक यांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर काढल्या त्या व्यवस्थेनेच कोणतीही सूचना न देता त्यांना ताब्यात घेतले आहे. जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचा हा प्रकार आहे.राज्यातील एका अत्यंत जबाबदार मंत्र्यांना केंद्रीय यंत्रणेकडून अशा प्रकारे त्रास दिला जातो, हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील वर्तन आहे. असेही पाटील म्हणाले आहेत.