कराड – मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने आरपारच्या लढाईचा इशारा दिला आहे. स्थगितीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर कराडमध्ये राज्यातील पहिली मराठा विद्यार्थी परिषद बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी होत आहे.
या परिषदेची साठी “चलो कराड’ची हाक देण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याला कराड तालुकाही अपवाद नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाकडून बुधवारी विद्यार्थी परिषदेचे आयोजन केले आहे. राज्यात अशी परिषद पहिल्यांदाच होत आहे. मराठा युवक युवतींचे शैक्षणिक प्रवेश अथवा नोकरी तसेच नोकरीच्या ठिकाणी मराठा युवक युवतींवर होणारे अन्याय आदी विषयांवर या परिषदेत विचारविनीमय होणार आहे.
आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर कराडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने येथील शिवतीर्थावर केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन केले आहे. याप्रकरणी पुढे काय भूमिका घ्यायची दोन ते तीन बैठकाही झाल्या आहेत. त्याचबरोबर याकामी विविध समित्याही गठीत करून त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची शैक्षणिक व नोकरी होणारी गैरसोय यावर विचारविनिमय करण्यासाठी कराडमध्ये राज्यास्तरीय पहिली मराठा विद्यार्थी परिषद होत आहे. राज्यातून या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.