न्यूयॉर्क : जगाला हतबल करून सोडणाऱ्या कोरोना विषाणूचा कहर काही केल्या थांबत नाही. जगभरातून या विषाणूंवर लस तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. मानवाला भेडसावणाऱ्या या कोरोना विषाणूचा प्रसार काही महिन्यांपूर्वी प्राण्यांमध्ये पण झाला होता. या विषाणूचा अमेरिकेतील एक जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याला संसर्ग झाला होता. दरम्यान,अमेरिकेतील याच पहिल्या कोरोनाबाधित कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. नॅशनल जिओग्राफी या वाहिनीने याविषयी माहिती दिली आहे.
अमेरिकेतील जर्मन शेफर्ड प्रजातीच्या ७ वर्षाच्या एका कुत्र्याला एप्रिल महिन्याच्या मध्यात श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर काही आठवड्यानंतर या कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. अमेरिकेच्या कृषी विभागाने जूनमध्ये याविषयी वृत्त दिले होते की न्यूयॉर्क राज्यातील एक जर्मन शेफर्ड हा कुत्रा कोरोना पॉझिटिव्ह ठरणार देशातील पहिला कुत्रा होता. परंतु मालकांना आपल्या कुत्र्याला कोरोना झाला आहे हे ओळखता आले नाही.
एप्रिलमध्ये कुत्र्याची तब्बेत स्थिर झाली होती. परंतु 11 जुलै रोजी या कुत्र्याने रक्ताच्या उलट्या करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याची तब्बेत बिघडत गेली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेतील प्राण्यांमध्ये कोरोनाव्हायरसच्या पुष्टी झालेल्या यूएसडीए डेटाबेसमध्ये 12 कुत्री, 10 मांजरी, एक वाघ आणि सिंह यांचा समावेश आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की कोरोना व्हायरस पसरविण्यात प्राणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात असा पुरावा सध्या नाही परंतु काही परिस्थितींमध्ये हा विषाणू लोकांपासून प्राण्यांमध्ये पसरतो असे दिसते.