नवोदय विद्यालयातील जळीत प्रकरणी पोलिसांनी नोंदविला चौकीदारांचा जबाब
टाकळी ढोकेश्वर – पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात 19 जानेवारी व 29 जानेवारी रोजी दोन वेगवेगळ्या आगी लावण्याच्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांचे मुख्य साक्षीदार असलेले विद्यालयातील चौकीदाराचे जबाब आज सकाळी पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी नोंदविले आहेत. मात्र अद्यापपर्यंत आगीचे कोडे पोलिसांसह समितीलाही उलगडलेले नाही. चौकीदाराच्या जबाबातून या दोन्ही घटनांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
केंद्रीय मानव संशाधन विकास मंत्रालयातर्फे चालविल्या जाणाऱ्या येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये 19 जानेवारी रोजी प्राचार्य एस. पी. बोरसे यांची चारचाकी (क्र. एमएच- 18 एजे-3412) ही कार आगीमध्ये जळून भस्मसात झाली होती. त्यानंतर 29 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अरवली वसतिगृहामधील चार मुलींच्या बेडला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेत इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनी वैष्णवी भांगरे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) ही भाजली असून, तिच्या हातापायाला जखम झाली आहे. तसेच ऋतुजा घाडगे व राजनंदिनी भिसे व प्राजक्ता पोटे या तीन विद्यार्थिनींच्या गाद्याही जळाल्या होत्या.
या दोन्ही घटनांचा मुख्य साक्षीदार चौकीदार फ्रान्सिस पवार हा असून, प्राचार्य एस. पी. बोरसे यांच्या शिफारशी नुसार त्याची नंदूरबार जिल्ह्यात बदली केली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आज पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी त्याला बोलावून घेवून जबाब नोंदविला आहे. त्यातून दोन्ही घटनांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे खा. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार गृहमंत्री देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले असून, पारनेरचे पो. नि. राजेश गवळी यांनी गेल्या आठ दिवसांपासून या विद्यालयातील कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविले आहेत.
तसेच नवी दिल्ली येथील नवोदय विद्यालय समितीचे उपायुक्त आर. मोहन व उपायुक्त अनुराधा यांचीही स्वतंत्र चौकशी समिती नेमली असून, तेही स्वतंत्र अहवाल नवोदय विद्यालय समितीला सादर करणार आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रविवारी (दि.2) विद्यालयाला भेट देत अध्यक्ष या नात्याने पोलिसांना स्वतंत्र चौकशीचे दिले आहेत.
माझ्यावर केलेली कारवाई सूडबुद्धीने : पवार
नवोदय विद्यालयातील दोन्ही घटनांचा मी साक्षीदार असून, प्राचार्य एस. पी. बोरसे यांना दोन्ही घटनांची मीच पहिल्यांदा माहिती दिली. त्यांच्या कारच्या नुकसानीला जबाबदार धरून माझ्याकडूनच भरपाईची मागणी केल्याचे पवार याने सांगितले. तसेच माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचा आरोपही त्याने केला.
मुख्य साक्षीदार पडद्याआड…?
या घटनांचा घटनाक्रम पाहता विद्यालयातील दोन्ही घटनांचे साक्षीदार चौकीदार पवार, वसतिगृह अधीक्षिका व अरवली वसतिगृहातील चार मुलींची विद्यालय प्रशासनाने तात्पुरती दुसरीकडे रवानगी केली. त्यामुळे या दोन्ही घटनांचे गूढ
कायम राहिले. त्यामुळे जाणूनबुजून या सर्व साक्षीदारांना पडद्यापाठीमागे कुणी व का ठेवले? याचा पण तपास होणे गरजेचे आहे.