पुणे – मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघातांची मालिका सुरूच असून, येथील अपघातांची संख्या दिवसागणित वाढतच चाली असल्याचं पाहायला मिळत आहे. आज बुधवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून महामार्गावर पलटी झाला. यात सात जण जखमी झाले आहेत. हा अपघात नऱ्हे नवले पुलाजवळ असणाऱ्या भूमकर पुलाजवळ घडला होता.
दरम्यान, अपघाताची ही बातमी ताजी असतानाच पुन्हा एक अपघाताचे वृत्त समोर आले आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर बोर घाटात भीषण अपघात झाला असून तीन ट्रक समोरासमोर एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. धडक एवढी जोरात होती की, यातील दोन ट्रक जवळ असलेल्या 100 फूट दरीत पलटी झाल्या आहेत. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली असून, वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर असणाऱ्या बोरघाट परिसरात तीन ट्रकची एकमेकांना जोरात धडक झाली. यामध्ये दोन कंटेनरचा चक्काचूर झाला आहे. ही धडक झाल्यानंतर दोन कंटेनर चक्क जवळ असलेल्या 100 फूट दरीत कोसळले, तर दुसऱ्या एका ट्रकचं केबिनलाही फटका बसला. या ट्रकचं केबिनच मागे असलेल्या मालवाहू सामानासह वेगळं झालं होतं.
या भीषण अपघातात 3 ते 4 वाहनं विचित्रपणे एकमेकांना धडकले आहेत. दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांकडून याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. भीषण अपघातात एक जण ठार झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर दुसिकडे दरीत कोसळलेल्या कंटेनरमधील एक वाहन चालक गंभीर जखमी आहे. सध्या त्याला बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या अपघातानंतर महार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.