बेटावर पिकनिकसाठी गेलेल्या कुटुंबाला ‘डाकू’ खेकडयांनी घेरलं; वाचा पुढं काय घडलं…

नुसतं खेकडा म्हंटलं तरी अनेकांच्या अंगावर शहारे येतात. मग विचार करा जर तुम्ही एखाद्या सुंदर समुद्री बेटावर तुमच्या कुटुंबियांसह भटकंतीसाठी गेला आहात… मोकळ्या आकाशाखाली टेन्ट उभारून रात्रीच्या मंद प्रकाशात बार्बेक्यू चिकनचा आस्वाद घेताय… अन् तेव्हड्यात तुमच्या अवतीभोवती नारळाच्या आकाराचे डझनभर खेकडे जमा होतात. काय अंगावर काटे आले?

मात्र ही भयावह घटना ख्रिसमस बेटावर भटकंतीसाठी गेलेल्या एका परिवारासोबत प्रत्यक्षात घडली आहे. त्याचं झालं असं की, एमी लुएटिच नावाचा एक इसम भटकंतीसाठी आपले कुटुंबीय व काही मित्रांसमवेत ऑस्ट्रेलिया शेजारील ख्रिसमस बेटावर पोहचला.

जंगलाच्या अगदी जवळ असलेल्या बेटावर त्यांनी रात्रीच्या मुक्कामासाठी टेन्ट उभारले. जेवणाचीही तयारी केली. मात्र मोकळ्या आकाशाखाली बार्बेक्यू चिकनचा आस्वाद घेत असतानाच त्यांच्या ठिय्यावर ‘डाकू’ खेकड्यांनी हल्ला चढवला.

आता नारळाच्या आकाराचे डझनभर खेकडे तुमच्या आसपास चालू लागल्यावरही भीती वाटली नाही तर नवलंच! मात्र खेकडे आसपास मुक्त विहार करत असतानाही एमी लुएटिच व त्यांचे कुटुंबीय जराही घाबरले नाहीत हे विशेष. याबाबतचे फोटोज ख्रिसमस बेटाच्या पर्यटन विभागातर्फे शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये कुटुंबातील एक लहानगी खेकडे आजूबाजूला फिरत असतानाही स्माईल करताना दिसत आहे.

पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे डाकू खेकडे अत्यंत शांत स्वभावाचे असतात. ते कोणालाही चावून त्यांचा हॉलिडे स्पॉईल करत नाहीत. मात्र तुम्ही सोबत आणलेलं खाण्याचं सामान ते लूटून नेतात. त्यांच्या याच सवयीमुळे या खेकड्यांना ‘डाकू’ खेकडे असं नाव पडलं आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.