#IPL2020 : मुंबईसाठी आज प्रतिष्ठेची लढत

आबूधाबी  – आयपीएल स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सातत्याने सलामीचे सामने गमावणाऱ्या मुंबई संघाला आजचा सामना प्रतिष्ठा जपण्यासाठी जिंकावाच लागणार आहे. 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने या स्पर्धेच्या इतिहासात वर्चस्व राखले असले तरीही त्यांना प्रत्येक स्पर्धेत सलामीचा सामना जिंकण्यात अपयश येत आहे. यंदाच्या स्पर्धेतही हेच घडले. अर्थात, त्यानंतर आमची बोहनी झाली असून आता स्पर्धा आम्हीच जिंकणार, असे जरी हसत हसत रोहितने व्यक्‍त केले असले तरी त्यासाठी केवळ विश्‍वास व्यक्त करून उपयोग नसून प्रत्यक्ष सामन्यात कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे.

आजचा सामना : मुंबई इंडियन्स विरूध्द कोलकाता नाइट रायडर्स

सामन्याची वेळ : सायंकाळी :- 7ः30 (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
ठिकाण :- आबूधाबी
थेट प्रक्षेपण :- स्टार स्पोर्टसवर

त्यांचा पहिला सामना चेन्नईशी झाला होता व आता कोलकाता संघाशी दुसरा सामना होत आहे. जे महत्त्वाचे दुवे चेन्नईकडे होते तसेच कोलकाताकडेही आहेत. हा सामना खरेतर मुंबईचे गोलंदाज व कोलकाताचे फलंदाज असा होणार आहे. पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांमध्ये सरस कामगिरी केलेला इंग्लंडचा आक्रमक फलंदाज इयान मॉर्गन, सिद्धेश लाड, राहुल त्रिपाठी, उदयोन्मुख शुभमन गिल, आंद्रे रसेल, सुनील नरेन याच्यासह कर्णधार दिनेश कार्तिक अशी तगडी फलंदाजी कोलकाताकडे आहे.

गोलंदाजीबाबत बोलायचे झाले तर यंदाच्या स्पर्धेतील सर्वात महागडा ठरलेला खेळाडू ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स याच्यासह लॉकी फर्ग्युसन या वेगवान गोलंदाजांसह फिरकी गोलंदाज कुलदीप यादवही त्यांच्या संघात असल्याने मुंबईसमोर मोठी धावसंख्या उभी करण्याचेच आव्हान राहणार आहे. मुंबईकडेही फलंदाजांची मोठी फळी आहे. मात्र, चेन्नईविरुद्ध ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या विकेट गमावल्या ते पाहता या सामन्यात त्यांना अत्यंत जबाबदारीने खेळावे लागणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आखातात फारसा यशस्वी ठरलेला नाही.

हा शिक्का पुसून काढण्यासाठी त्यालाही आपल्या चुका दुरुस्त कराव्या लागणार आहेत. त्याच्या साथीला सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, कॅरन पोलार्ड व हार्दिक पंड्या असल्याने त्यांची फलंदाजी जास्त सशक्‍त वाटत आहे. मात्र, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसित मलिंगाची उणीव त्यांना सातत्याने जाणावणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत प्रमुख भार जसप्रीत बुमराहसह नॅथन कुल्टरनाइल व जेम्स पॅटिन्सन यांनाच वाहावी लागणार आहे.

फिरकीला साथ देणारी खेळपट्टी 

या मैदानावरील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला जास्त मदत करते हा इतिहास असल्याने मुंबईसमोर कोलकात्याच्या सुनील नरेनच्या गोलंदाजीचे दडपण राहणार आहे. कोलकात्याच्या मानाने मुंबईकडे सशक्‍त फिरकी गोलंदाजी नाही त्यामुळे कोलकात्याच्या फलंदाजांना आजचा सामना हा सोपा पेपर ठरेल हीच शक्‍यता जास्त आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.