रांची : भारताची ऐतिहासिक चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली आणि जगात देशाचा डंका पुन्हा एकदा वाजला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत हा पहिला देश बनला. मात्र हे सगळं असं असताना आता या मोहिमेच्या पडद्यामागील काही गोष्टी समोर येताना दिसत आहेत. या चांद्रयानच्या लॉन्चिंगसाठी लॉन्चपॅड तयार करणाऱ्या अभियंत्यांवर सध्या इडली विकून आपला उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे.
रांचीतील हेवी इंजिनीअरिंग कॉर्पोरेशनच्या (एचईसी) अभियंत्यांनी चांद्रयानसह अन्य मोहिमांमध्ये वापरण्यात आलेले लॉन्चपॅड तयार केले आहे. मात्र असे असले तरी सरकारी नोकरी असूनही गेल्या १८ महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एचईसीमध्ये कार्यरत असलेल्या दीपक कुमार यांची घरातील आर्थिक बेताची आहे. त्यामुळे सध्या ते इडली विकून उदरनिर्वाह करत आहेत. १८ महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेला नाही.
अशा कठीण परिस्थितीचा सामना करत असलेले दीपक कुमार एकटेच नाहीत तर एचईसीच्या २८०० कर्मचाऱ्यांचेही हाल तसेच असल्याचे सांगण्यात येत आहे. दीपक यांची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दीपक यांच्यासमोर कोणताच पर्याय नसल्याने त्यांनी इडली आणि चहाची टपरी सुरू केली.
झारखंडची राजधानी रांचीतील धुर्वा परिसरात दीपक यांचे छोटे दुकान आहे. गेल्या काही दिवसांपासून ते याठिकाणी इडली विक्रीचा व्यवसाय करत आहेत. सकाळी इडली विकून दुपारी कामाला जातात. संध्याकाळी पुन्हा इडली विकून घरी परततात.
२०१२ मध्ये दीपक एका खासगी कंपनीत काम करायचे. त्यांना महिन्याला २५ हजार रुपये पगार मिळायचा. एचईसीमध्ये ते केवळ ८ हजार रुपयांच्या पगारावर रुजू झाले. सरकारी नोकरी असल्याने त्यांनी एचईसीची नोकरी स्वीकारली.
दरम्यान, आपल्या सध्याच्या परिस्थितीवर बोलताना,’पगार मिळाला नाही म्हणून सुरुवातीला क्रेडिट कार्डनं घर चालवलं. पण दोन लाखांचं कर्ज झालं. मला दिवाळखोर घोषित करण्यात आलं. त्यानंतर नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले. आता डोक्यावर ४ लाखांचं कर्ज आहे. अनेकांनी उधारी बंद केली.
पत्नीचे दागिने गहाण ठेवले आहेत. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मी इडलीचं दुकान सुरू केलं. दिवसाला ३०० ते ४०० रुपयांची इडली विकतो. त्यातून कधी ५० तर १०० रुपये सुटतात. याच पैशातून सध्या घर चालतंय,’ अशी व्यथा दीपक यांनी मांडली.
एचईसी कंपनीने इस्रोला २००३ ते २०१० या कालावधीत मोबाईल लॉन्चिंग पॅड पेडस्टल, हॅमर हेड टॉवर क्रेन, ईओटी क्रेन, फोल्डिंग कम वर्टिकल रिपोजिशनेबल प्लॅटफॉर्म, हॉरिझाँटल स्लायडिंग डोर्सचा पुरवठा केला.
पण चांद्रयान-३ मोहिमेतील कोणतंही उपकरण तयार करण्यात एचईसीने मदत न केल्याचा सरकारचा दावा आहे. यावर एचईसीचे व्यवस्थापक पुरेंदू दत्त यांनी प्रतिक्रिया दिली. तांत्रिकदृष्ट्या केंद्र सरकारची बाजू खरीही असेल.
कारण चांद्रयान-३ साठी कोणताही वेगळा लॉन्चपॅड तयार करण्यात आलेलं नव्हतं. पण भारतात एचईसीशिवाय कोणतीही कंपनी लॉन्चपॅड तयार करत नाही.