नवी दिल्ली – चंद्रावर चांद्रयान-३ च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर चंद्राच्या पृष्ठभागावर त्याचा प्रवास सुरू झाला आहे. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर, इस्रोने आता प्रज्ञान रोव्हरशी संबंधित एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामुळे आता हे रोव्हर कशा पद्धतीने मुव्हमेंट करत आहे हे सर्वांनाच पाहता येणार आहे.
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी 7.30 वाजता बंगळुरू येथील इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी चांद्रयान-3 मिशनमधील टीमच्या शास्त्रज्ञांची भेट घेताना सर्व शास्त्रज्ञांसोबत ग्रुप फोटोही काढला. इस्रो कमांड सेंटरमध्ये इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंतप्रधानांनी सोमनाथ यांना मिठी मारली आणि पाठीवर थाप दिली. या मोहिमेमुळे पुन्हा एकदा भारताचे नाव जगभर अभिमानाने घेतले जात आहे. अशात इस्रोकडून येणारे प्रत्येक अपडेट भारतीयांसाठी खास आहे.
इस्रोने प्रज्ञान रोव्हरचा नवीन व्हिडिओ जारी केला आहे
या व्हिडिओमध्ये प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या ‘शिवशक्ती पॉइंट’ भोवती गुपिते शोधत फिरताना दिसत आहे. ISRO ने लिहिले इथे नवीन काय आहे? याचा शोध घेत प्रज्ञान रोव्हर ‘शिवशक्ती पॉईंट’भोवती फिरत आहे.
Chandrayaan-3 Mission:
🔍What’s new here?Pragyan rover roams around Shiv Shakti Point in pursuit of lunar secrets at the South Pole 🌗! pic.twitter.com/1g5gQsgrjM
— ISRO (@isro) August 26, 2023
मोदींनी केल्या तीन महत्वाच्या घोषणा
पहिली – भारत दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन (नॅशनल स्पेस डे) साजरा करेल.
दुसरी- ज्या ठिकाणी लॅंडर चंद्रावर उतरले, त्या जागेला “शिवशक्ती पॉइंट’ असे म्हटले जाईल.
तिसरी- ज्या ठिकाणी चांद्रयान-2 च्या पायाचे ठसे आहेत, त्या ठिकाणाला “तिरंगा’ असे म्हटले जाईल.