नवी दिल्ली – पाकिस्तानात वीज बिलांच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ उफाळून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आता तब्बल 40 हजार पाकिस्तानी रुपयांचे वीज बिल भरू न शकल्यामुळे एका व्यक्तीने थेट आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला आहे. पंजाब प्रांतातील दिजकोट शहरातील मुहम्मद हमजा नावाच्या 35 वर्षीय व्यक्तीने आर्थिक ताणामुळे आणि वारेमाप वीज बिल भरू न शकल्यामुळे स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली, असे स्थानिक वर्तमानपत्राने म्हटले आहे. या प्रकरणातील तथ्य तपासून बघितले जात असल्याचे स्थानिक पोलिसांनी म्हटले आहे.
वीज बिल भरू न शकल्यामुळे आत्महत्या झाल्याचे हे या आठवड्यातले दुसरे उदाहरण आहे. मंगळवारी पंजाब प्रांतातील एका महिलेनेही वीज बिल भरू न शकल्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. या महिलेला 10 हजार रुपयांचे वीज बिल आले होते.
या महिलेच्या पतीने घरातील चीजवस्तू विकून आणि कर्ज काढून हे वीज बिल भरले होते. तरी मुलतान इलेक्ट्रीक पॉवर कंपनीने तोडलेली वीज पुन्हा सुरू केली नव्हती. हे वीज बिल भरण्यासाठी एवढे पैसे खर्च झाले की आता दैनंदिन खर्च भागवण्यासाठी आणि घरातील रेशनसाठीही पैसे शिल्लक राहिले नसल्याचे या महिलेच्या पतीने माध्यमांना सांगितले.
पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वरउल हक काकर यांनी वीज वितरण कंपन्यांना आणि उर्जा मंत्रालयाला वीजेची बिले कमी करण्यासाठीच्या उपाय योजना तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.