पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेश सरचिटणीसपदी शिवाजी खांडेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खांडेकर यांची प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील नेते म्हणून कामगिरी उल्लेखनीय ठरलेली आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते खांडेकर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. खांडेकर यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांच्या विविध महत्वाच्या पदांची धूरा सांभाळली आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सतत विविध आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिलेला आहे. खांडेकर यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पद देवून त्यांना राज्यात काम करण्याची संधी देण्यात आलेली आहे.
पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करुन पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वशक्तीनिशी खांडेकर हे योगदान देतील. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी खांडेकर प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवण्यात आलेली आहे.