तयारी पूर्ण : फक्त आधार क्रमांक द्यावा लागणार; आतापर्यंत 30 कोटी 75 लाख आधार-पॅन कार्ड जोडले
पुणे – आधार कार्डाच्या सादरीकरणानंतर ई-पॅन तत्काळ मिळण्याची सुविधा उपलब्ध चालू महिन्यातच केली जाणार असल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचे सूचित केले होते. त्याची अंमलबजावणी सुरू करण्याची प्रक्रिया सध्या चालू असून पुढील पंधरा दिवसांआत नागरिकांना ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी सांगितले. अगोदर पॅन क्रमांकासाठी तपशिलात अर्ज भरून द्यावा लागत होता. आता तशी गरज पडणार नाही.
ही व्यवस्था नेमकी कधी अंमलात येणार, याविषयी ते म्हणाले की, यासाठीची तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. काही दिवसातच याची अंमलबजावणी सुरू होईल. याबद्दल ते म्हणाले, “नागरिकांना प्राप्तीकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन आपला आधार क्रमांक सादर करावा लागेल. त्यानंतर वन टाइम पासवर्ड पाठवण्यात येईल. हा पासवर्ड आधारशी संलग्न केलेल्या मोबाइल क्रमांकावर पाठविण्यात येईल. या आधारावर फेरतपासणी झाल्यानंतर लगेच पॅन क्रमांक पाठवण्यात येईल. अशा नागरिकांना ई- पॅन कार्ड लगेच डाउनलोड करता येऊ शकेल.
त्यामुळे एक तर करदात्यांना पॅन कार्डसाठी फॉर्म भरावा लागणार नाही. त्याचबरोबर कर विभागाला करदात्याच्या घराच्या पत्त्यावर पॅन कार्ड पाठवण्याची गरज राहणार नाही. पॅन आणि आधार कार्ड जोडणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. आतापर्यंत 30 कोटी 75 लाख नागरिकांचे पॅन आणि आधार कार्ड जोडले आले आहे.
मात्र, आणखीही 17 कोटी 58 लाख लोकांनी आणि आधार कार्ड पॅनशी जोडलेले नाही. यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे. त्यानंतर जुने पॅन कार्ड रद्द केले जाऊ शकते. मात्र, आता नवी व्यवस्था लागू करण्यात आल्यामुळे करदात्यांना त्रास होणार नाही.