वाघोली, (प्रतिनिधी)- मुंबई नार्कोटिक्स डीपार्टमेंट मधून बोलत असल्याचे सांगून तैवानला पाठविण्यात आलेल्या पार्सलमध्ये एमडी ड्रग्स सापडल्याची भिती दाखवून सायबर चोरट्यांनी वाघोलीतील एकाला सुमारे 10 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरट्यांनी फिर्यादींच्या मोबाईलवर आयव्हिआर फोन करून फेडेक्समधून बोलत असल्याचे सांगत तुम्ही मुंबई ते तैवानला पाठविलेल्या पार्सलमध्ये एमडी ड्रग्स सापडल्याने गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. फिर्यादीने पुण्यात असल्याचे सांगितल्यानंतर स्कायपी वर व्हिडीओ कॉल करून या गुन्ह्यात आरोपी करण्याची भीती दाखविण्यात आली.
फिर्यादीचे आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन तुमचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत अशीही भीती दाखवून 10 लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. फिर्यादीने सदरची रक्कम ट्रान्स्फर केली. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसात धाव घेतली. अधिक तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.