महाबळेश्वर (प्रतिनिधी)- येथून २ किलोमीटरवरील देवी चौकात ७ एप्रिल रोजी अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या पिकअप व्हॅनचा शोध घेऊन महाबळेश्वर पोलिसांनी चालक दत्तात्रय रामचंद्र माने (वय 59, रा. मंगळवार पेठ, सातारा) या संशयितास ताब्यात घेतले आहे.
या अपघातात एका अज्ञात वाहनाची व मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील अजय चंद्रकांत कदम (वय 31) यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर अज्ञात वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरारी झाला होता. अज्ञात वाहनाचा तपास करण्याचे आव्हान महाबळेश्वर पोलिसांसमोर होते.
यासाठी पोलिसांनी महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. पंरतु, तपास लागला नाही. धडक दिलेले वाहन मुंबईच्या दिशेने गेले होते. परंतु, ते आले कोठून याचा तपास पोलिसांनी सुरू केला. सातारा येथील एका पेट्रोल पंपावर संबंधित वाहन आढळून आले.
तेथील सीसीटीव्हीमध्ये संबंधित वाहनाचा क्रमांक मिळाला. त्या क्रमांकावरून तपास केला असता हे वाहन पिकअप व्हॅन असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या व्हॅनमध्ये चार व्यक्ती होत्या. वाहनचालकाने अपघाताच्या सर्व खाणाखुणा बुजवून मागील आठवडयात या वाहनाने अपघात केला असेल असे कोणालाही वाटणार नाही अशी पिकअप व्हॅन तयार केली होती. परंतु, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता चालकाने गुन्हा कबूल करून अपघात कसा झाला ते स्पष्ट केले.
महाबळेश्वर पोलिसांनी केवळ सहा दिवसांत गुन्हा उघडकीस आणला आणि संशयितास गजाआड केल्याने शहरातून पोलिसांचे कौतुक केले जात आहे. पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रौफ इनामदार तपास करीत आहेत.