नागपूर – सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरूण सरकारी अधिकाऱ्याने नागपुरात (Nagpur News) आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. शुभम कांबळे (वय २५) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते अन्न व औषध प्रशासन विभागात निरीक्षकपदी कार्यरत होते.
पोलिसांना शुभम कांबळे (Shubham Kambale) यांच्या खोलीत ४ ते ५ रसायनांच्या बाटल्याही आढळल्या आहेत. तसेच एक सुसाईड नोटही आढळली आहे. या नोटमध्ये कांबळे यांनी आपल्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार न धरण्याची विनंतीही केली आहे. आयपीएस व आयएएस होण्यात अपयश आल्याची खंत व्यक्त करत हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही त्यात नमूद केले आहे.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. शुभम कांबळे मुळचे परभणीचे होते. ते आपल्या मित्राला भेटण्यासाठी नागपूरला आले होते. त्यांनी यासाठी हॉटेलमध्ये एक खोलीही बूक केली होती. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी हॉटेलच्या लँडलाईनवर एक फोन कॉल आला. त्यानंतर मॅनेजरने त्याची माहिती देण्यासाठी एका कर्मचाऱ्याला कांबळे यांच्या रूमवर पाठवले.
सदर कर्मचाऱ्याने अनेकदा दार ठोठावूनही शुभम कांबळे यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हॉटेल मालकाने थेट पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरवाजा उघडला. शहरातील गणेशपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.