प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 26 -राज्यात सत्ताबदल झाले. सत्तांतर होऊन राज्याचा कारभार सुरू आहे. मात्र यात कार्यकर्त्यांचे मरण झाले, या आशयाभोवती पुण्यातील गणेशोत्सवात यंदा देखावा सादर केला जाणार आहे. त्याची चर्चा पुणेकरांमध्ये रंगली आहे. राजकीय विडबंनात्मक असा गणेशात्सवातील देखाव्यात सहा-सात राजकीय नेत्यांची मूर्ती हे सर्वांचे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. याचबरोबर यंदा अनेक गणेशोत्सव मंडळांनी जिवंत देखाव्यात अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे.
लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौकात नरेंद्र मंडळ “सत्तांतरणाचे समुद्रमंथन अन् कार्यकर्त्यांची मरण’ हा देखावा सादर करणार आहे. प्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश तारू राजकीय नेत्यांच्या मूर्ती साकारत असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेली दोन वर्षे करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा मात्र कोणतेही निर्बंध नसल्याने गणेशोत्सव पारंपरिक आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव आता चार दिवसांवर येऊन ठेपला असून, सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरू केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडून वेगळा गट तयार केला आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. ही घटनाच अनपेक्षित आणि आश्चर्यकारक होती. त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती. आता मात्र त्यांचे प्रतिबिंब पुण्यातील देखाव्यातून पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे या अनोख्या देखाव्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
ठाकरे, शिंदे यांच्या हुबेहुब मूर्ती
मंडळाचे अध्यक्ष साई काशिद यांनी ही संकल्पना दिल्यानंतर प्रसिद्ध कलाकार सतीश तारू यांनी त्यांच्या कारखान्यावर या देखाव्याचे काम सुरू केले आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या हुबेहुब मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांच्याही मूर्ती देखाव्यात आहेत. हा जिवंत देखावा सर्वतोत्तम होण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे तारू यांनी सांगितले.