पिंपरी -शाळा सुरू होऊन तीन महिने झाले आहेत. तरी अजूनही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने गोर-गरीब विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले नाही. पालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिल्याचा आरोपही पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना तत्काळ गणवेश उपलब्ध करून त्याचे वाटप करावे, अशी मागणी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली आहे. राज्यातील, शहरातील शाळा सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र, पालिकेने अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश तसेत इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले नाही. पालिका प्रशासनाच्या अनस्थेमुळे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत.
याला सर्वस्व प्रशासन जबाबदार आहे. गणवेश निविदा काढून द्यायचे की गणवेश खरेदीचे अधिकार शाळा मुख्याधापाकांना द्यायचे या घोळात वेळ निघून चालला आहे आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. गणपती उत्सव 31 तारखेपासून सुरू होत आहे. गणपती विसर्जनापूर्वी जर प्रशासनाने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले नाही तर या विषयी आपण सरकारकडे तक्रार करू, असा इशारा आमदार बनसोडे यांनी दिला आहे.