विद्वेषाच्या वातावरणात धार्मिक सौहार्दाचे अभिनव दर्शन, का निदर्शनावेळी घडलेली घटना
एर्नाकुलम : सुधारीत नागरिकत्व कायद्याला विरोध करताना (का) केरळमध्ये चर्चच्या आवारात मुस्लिम समुदायाला दैनंदिन प्रार्थना (मघरीब) पठणाची परवानगी देत धार्मिक सौहार्दाचे अनोखे दर्शन घडवले. एर्नाकुलम जिल्ह्यातील मार्थोमा चेराईपल्ली येथील स्थानिक चर्चमध्ये हा अनोखा सोहोळा पहायला मिळाला.
का विरोधात मवात्तूपूझा ते कोठामंगलम असा 10 किमी अंतराचा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा संपेपर्यंत सुर्यास्त होत आला होता. त्यामुळे संध्याकाळच्या प्रार्थनेची वेळ होत आली होती. त्यावेळी चर्चच्या धर्मगुरूंनी मुस्लिम बांधवांसाठी केवळ दरवाजे उघडले असे नव्हे तर त्यांच्या पारंपरिक विधीसाठी पाणीही उपलबध्द करून दिले. चर्चमधील एक गाणे पारंपरिक मुस्लिम पध्दतीने म्हणण्यात आले.
लोकांना ज्यावेळी धर्माच्या नावावर विभाजित करण्याचे प्रयत्न काही शक्तींकडून सुरू असतात, त्यावेळी अशा घटना देशातील सलोख्याच्या भावनेला ताकद देत असतात, असे कॉग्रेस नेते मॅथ्यू कुझ्हालनंदन यांनी सांगितले.
फादर पारूथीवेली म्हणाले, अशा पध्दतीने एकमेकांना सहकार्य करण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. ही काही केरळातील पहिली घटना नाही. चेरामन जुमा मस्जिदीमध्ये दसऱ्याला विद्यतारंभम् सोहोळा होत असतो. सरस्वतीची पूजाही होते.