कोपरगाव, (प्रतिनिधी) – आत्मा मालिक येथे भारतीय खेल प्राधिकरण (SAI) तर्फे दि. 29 ते 30 एप्रिल रोजी आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे नवीन मल्लांची भरती प्रक्रिया घेण्यात येणार असून, त्यासाठीची निवड चाचणी ही आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण या ठिकाणी आयोजित केल्याची माहिती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ही निवड चाचणी प्रक्रिया होणार असून, कुस्ती कोच रुपेंदर पूनिया व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक, राष्ट्रीय कुस्ती पंच भरत नायकल यांच्या उपस्थितीत ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे. आत्मा मालिक कुस्ती केंद्राला 2006 पासून साईची मान्यता आहे. आजपर्यंत आत्मा मालिकमधून 4 विद्यार्थ्यानी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून पदके मिळविली आहेत.
साईमार्फत आयोजित केलेल्या या निवड चाचणी प्रक्रियेकरीता 10 ते 16 वयोगटातील नवीन मल्लांची भरती केली जाणार आहे. निवड चाचणी प्रक्रियेतून निवड झालेल्या मल्लांना आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे प्रशिक्षणासाठी राहणे अनिवार्य असल्याचे आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक भरत नायकल यांनी सांगितले.
या मल्लांना भारतीय खेल प्राधिकरण (SAI) तर्फे दरमहा 1 हजार रुपये मानधन तसेच दरवर्षी एक स्पोर्ट्स किट दिले जाते. महाराष्ट्रातील मल्लांनी या निवड चाचणीमध्ये मोठया संख्येने सहभागी होण्यासाठी दि. 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे हजर रहावे, असे आवाहन आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी केले. निवड चाचणी प्रक्रियेला येतांनी मल्लांनी जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळेचे बोनाफाईड, आधार कार्ड, चार पासपोर्ट साईज फोटो, स्वतःचे बॅंक पासबुक आदी सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व झेराॅक्स सोबत आणावीत.