- शेकडो तरुण बेरोजगार : हजारो तरुणांचा व्यायाम थांबला
पिंपरी – करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिम सहा महिन्यांपासून बंद आहेत. जिम चालक अर्थिक विंवचनेत सापडले आहेत. त्यांना जागेचे भाडे, वीज बिल भरणे देखील शक्य होत नाही. अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे सर्व परिस्थितीचा विचार करून अनलॉकमध्ये सुरु केलेल्या हॉटेल, रेस्टॉरंटच्या पार्श्वभूमीवर शहरातील जिमदेखील पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी आता पुन्हा जोर धरु लागली आहे.
शहरात दोनशेच्या आसपास जिम व फिटनेस क्लब आहेत. व्यायामप्रेमी तरुणांकडून रोजगारासाठी जिम सुरु केल्या आहेत. या माध्यमातून अनेक जिम इन्स्ट्रक्टर तरुणांना रोजगार मिळाला आहे. करोना काळात अनेक व्यवसायावर बंदी घातली होती. टप्याटप्प्याने ती उठविण्यात आली. मात्र, जिम चालू करण्यावरील बंदी अद्याप उठविण्यात आली नाही. अनलॉकमध्ये राज्यात अनेक व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. आजपासून शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट देखील सुरू झाले आहेत. मात्र, जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिम चालकांनी संताप व्यक्त केला आहे.
जिमचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, जिम सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्याकरिता सलग दोन दिवस आंदोलन करुन, या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, तरीदेखील जिमचालकांच्या मागण्या धुडकावून लावण्यात आल्या. अनलॉक पाचबाबतच्या आदेश महापालिक़ा प्रशासनाने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये काही अटींवर रेस्टॉरंट व हॉटेल चालकांना व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या अनलॉकमध्ये शहरातील जिमचालकांना व्यवसाय सुरु करण्याविषयी सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता होती; मात्र त्यांना दिलासा मिळालेला नाही.
शहरातील जिम चालकांच्या संघटनेने शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची रविवारी (दि.4) भेट घेतली. जिम चालू करण्याबाबत निवेदन दिले. सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून जिम चालकांची व्यथा मांडली आहे.