श्रीनगर – काश्मिरात श्रीनगर शहराच्या परिसरात नोगाम येथे आज सुरक्षा दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला त्यात दोन जवान शहीद झाले आहेत. हे दोन्ही जवान सीआरपीएफमध्ये सेवेस होते.
आज दुपारच्या सुमाराला सुरक्षा दलाचे एक पथक कंदीझल पुलावरून जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे एकूण पाच जवान जखमी झाले आहेत.
जखमींना आर्मीच्या 92 बेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू होण्यापूर्वीच हे दोन जखमी जवान गतप्राण झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
कॉन्स्टेबल शैलेंद्र प्रतापसिंह आणि देवेंद्रकुमार त्रिपाठी अशी शहीद झालेल्या दोन जवानांची नावे आहेत. अन्य जखमी जवानांची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान, घटनास्थळी जादा सुरक्षा फौज फाटा पाठवून या परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध जारी आहे.