बाजाराचा मूड पाहून मालमत्ता विक्रीचा निर्णय (भाग-2)

घर विकण्याची प्रक्रिया ही घर खरेदीपेक्षा वेगळी आहे. मात्र, दोन्हीसाठी चांगली रणनिती तयार करून ती अंमलात आणणे महत्त्वाचे आहे. चांगल्या रणनितीच्या जोरावर मालमत्तेला चांगला भाव मिळू शकतो. काही वेळा जाहिरात देऊनही ग्राहक येत नाहीत. यासाठी घराची योग्य रितीने मार्केटिंग करणे तितकेच महत्त्वाचे आहे. मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करावा.

बाजाराचा मूड पाहून मालमत्ता विक्रीचा निर्णय (भाग-1)

कागदपत्रांची पूर्तता
विक्री निश्‍चित करताना घरासंबंधीचे सर्व आवश्‍यक कागदपत्र तयार असावेत. त्यामुळे घर विक्रीची शक्‍यता अधिक राहते. यासाठी कायदेशीर सल्ला देखील घ्यायला हवा. आवश्‍यक कागदपत्रांच्या सत्यप्रती उपलब्ध असल्यास खरेदीदारास तपासणीसाठी देता येतात. घराशी निगडित महत्त्वाची कागदपत्रे घरातच ठेवणे श्रेयस्कर राहील. घर खरेदी करारनामा, प्रॉपर्टी कार्ड, ओ.सी./सी.सी. अन्य सर्टिफिकेट, गृहकर्जाचे विवरण आदीसंबंधी कागदपत्रे तयार असावीत. लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत, अशा ठिकाणी कागदपत्रे ठेवावीत. गृहकर्जापोटी कागदपत्रे बॅंकेत जमा असतील तर त्याचीही माहिती खरेदीदारांना देणे महत्त्वाचे ठरते.

खरेदीदार शोधण्यासाठी मदत
अलीकडच्या काळात एखादी मालमत्ता खरेदीदारांपर्यंत पोचणे कठीण मानले जाते. कारण बहुतांश मंडळी जुनी मालमत्ता खरेदीत फारशी रुची दाखवत नाहीत. यासाठी रिअल इस्टेट ब्रोकरची मदत घेणे फायदेशीर ठरू शकते. घर विक्री हा एक रणनितीचा भाग आहे. रिअल इस्टेट दलालांकडे चांगले नेटवर्क असते. अशावेळी तो आपल्या मालमत्तेसाठी चांगला खरेदीदार आणू शकतो. ही मंडळी केवळ खरेदीदारच आणत नाही तर कागदपत्रांची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी तसेच सरकारी पातळीवरच्या परवानग्या काढण्यासाठी देखील मदत करतात. जर मध्यस्थ नको असेल तर संकेतस्थळावरही घर विक्रीची जाहिरात करू शकतो. वर्तमानपत्रातूनही घर विक्रीची जाहिरात देऊ शकतो. याशिवाय नातेवाईक, मित्र परिवार, कार्यालयातील सहकारी, सोसायटी, ओळखीचा दुकानदार आदींना मालमत्ता विक्रीची माहिती देणे देखील उपयुक्त ठरू शकते.

घर विक्रीची प्रक्रिया जाणून घ्या
घर विक्रीच्या व्यवहारातील कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी आपल्याकडे मालमत्तेची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. मालमत्ता खरेदी करणारा व्यक्ती कोणकोणते शुल्क भरणार आहे, याची माहिती घ्यावी. विक्रेत्याकडे अप टू डेट माहिती असेल तर किरकोळ कारणावरून विक्रीचे व्यवहार फिसकटत नाहीत.

योग्य प्रकारची मार्केटिंग
घर विक्रीसाठी खरेदीदार शोधणे कठीण बाब आहे. काही वेळा जाहिरात देऊनही ग्राहक येत नाहीत. यासाठी घराची योग्य रितीने मार्केटिंग करणे तितकेच महत्त्वाचे आहे. मार्केटिंगसाठी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करावा. प्रॉपर्टी डिलरशी संपर्क साधण्याव्यतिरिक्त प्रिंट, ऑनलाईनवरही जाहिरात देऊ शकतो. ऑनलाइनवरच्या जाहिराती विनाशुल्क असतात. आपल्या मालमत्तेचा जेवढा अधिक प्रचार करू, तेवढ्या प्रमाणात खरेदीदार उत्सुकता दाखवतील.

– मानसी जोशी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.