श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील नदीमध्ये एक बोट बुडाल्याने काही पर्यटकांच्या जीवावर आलेले संकट एका गाईडने स्वतःच्या बलिदानाने परतवून लावले. या गाईडने नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या 5 पर्यटकांना वाचवले. मात्र त्याला स्वतःचा जीव मात्र गमवावा लागला. काश्मीरमधील अस्सल “आश्मिरीयत’चे दर्शन या गाईडच्या धाडसी आणि त्यागाच्य कृतीमुळे घडले.
रौफ अहमद दर असे या 35 वर्षीय टुरिस्ट गाईडचे नाव आहे. दर हे पहलगाममधील निसर्गरम्य अशा लिडर नदीमध्ये तराफा चलवण्यचे कम करत् होते. नेहमीप्रमाणे त्यांच्या तराफ्यमध्ये नौकानयनासाठी काही पर्यटक बसले आणि अचानक सुटलेल्या वाऱ्यामुळे बोट हेलकावे खावू लागली. तोल न सांभाळला गेल्यामुळे बोट उलटली आणि बोटीतील 5 पर्यटक बुडायला लागले. या 5 जणांमध्ये 3 स्थानिक आणि पश्चिम बंगालमधील एका दाम्पत्याचा समावेश होता.
बोट उलटल्यावर दर स्वतः पोहत किनाऱ्यावर आले. मात्र इतर सर्व बुडत असल्याचे पाहून ते पुन्हा पोहत सर्वांना वाचवण्यासाठी गेले. त्यांनी 5 जणांना वाचवले असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र ते स्वतः पाण्यात बुडाले.
आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने पोलिस आणि नागरिकांच्या मदतीने या भागात संध्याकाळपर्यंत शोधकार्य सुरू होते. मात्र दर यांचा मृतदेह सापडू शकला नाही.
दर यांचा मृत्यूबाबत परिसरातून दुःख व्यक्त करण्यात आले. आपत्तीतून बचावलेल्या दाम्पत्याने आपल्याला दर यांच्यामुळे नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त केली. दर यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत मुख्य सचिवांनी मंजूर केली आहे. दर यांचे नाव शौर्य पुरस्कारासाठी शिफारस केली असल्याचे अनंतनागच्या उपायुक्तांनी सांगितले. दर यांच्या त्याग आणि बलिदानामुळे त्यांच्या हौतात्म्याला आपण सलाम करत असल्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.