पारनेर – पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे बिबट्याच्या दोन ते तीन महिन्यांच्या बछड्याचा मृत्यू झाला. मृत्यूमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र वनाधिकार्यांनी यासंदर्भात पंचनामा करून बिबट्याच्या बछड्याचे शवविच्छेदन केले.
तालुक्यात बिबट्यांनी सध्या धुमाकूळ घातला आहे. अनेक भागांमध्ये बिबटे व त्यांचे बछडे आढळून आले आहेत. तालुक्यातील पिंपळनेर येथील शेतकरी भानुदास एकनाथ गाजरे यांच्या शेतात आज सकाळी दहाच्या सुमारास बिबट्याचा बछडा मृतावस्थेत त्यांना दिसून आला. त्यानंतर त्यांनी त्वरित याबाबत पारनेर वनविभागाशी संपर्क साधला. सहायक वनसंरक्षक एस. पी. पाटील, पारनेरचे वनक्षेत्रपाल सीमा गोरे, वनपाल संदीप भोसले, वनरक्षक अश्विनी सोळुंके, वनमजूर गोरे पाचरणे, जनार्दन बोरुडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून बछड्याचे शवविच्छेदन केले.
दरम्यान, पिंपळनेर व राळेगण थेरपाळ आजूबाजूच्या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या परिसरामध्ये ऊस व इतर झाडी असल्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर येथे नेहमी असतो. काही दिवसांपूर्वी येथील ऊस तोड झाली होती. त्या शेजारीच बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला आहे. मादी जातीचा बछडा तीन महिन्यांचे असण्याची शक्यता असून, सर्पदंश किंवा इतर कारणाने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एक महिन्यापूर्वी करंदी व किन्ही या परिसरात एका बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज पिंपळनेर येथे बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला आहे.