तळेगावचे सांस्कृतिक वैभव अवतरले रंगमंचावर

“मागोवा स्वर पर्वाचा’ कार्यक्रम ः कलाकारांचा देखणा अविष्कार

तळेगाव दाभाडे – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखा व श्रीरंग कलानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगावचे गानतपस्वी कै. शरदराव जोशी यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीवर आधारित “मागोवा स्वर पर्वाचा’ हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने शरदरावांच्या शिष्यांनी गायन, नृत्य, वादनाच्या सादरीकरणाने अनोखी गुरुदक्षिणा अर्पण केली. तळेगावचे सांस्कृतिक वैभव एकाच रंगमंचावर आल्याचे पहायला मिळाले.

कार्यक्रमाची सुरुवात शरद जोशी यांनी रचलेल्या आणि संगीत बद्ध केलेल्या “ओंकारायं परमेशोयं’ या श्‍लोकाने झाली. वैजयंती बागुल यांनी सरस्वती रागातील तीन तालातील बंदिश सादर केली. यानंतर संपदा थिटे यांच्या शिष्यांनी भूप रागातील तराणा आणि यमन रागातील सरगम समूह स्वरात सादर करून रसिकांच्या टाळ्या मिळविल्या.

शरदरावांनी आठ मात्रात बांधलेली गणेश वंदना नृत्य अभ्यासक किर्ती ढेंबे पेडणेकर यांनी तर “गोरख अभोगी’ या अनवट रागातील बंदिश शुभदा आठवले यांनी सादर केली. त्यानंतर मधुरा वेलणकर यांनी “श्रावण आला श्रावण आला’ ही संगीतातली रचना सादर केली. धनश्री शिंदे हिने मनाचे श्‍लोक सादर केले. “आंब्याच्या झाडावर भरली पक्षांची शाळा’ हे बालगीत नृत्य रसिकांची दाद मिळवून गेले.

“संगीत चैती’ या नाटकातील प्रवेश अक्षय देशपांडे, कौस्तुभ ओक व राजीव कुमठेकर यांनी सादर केला. मीनल कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी “ऋतुदर्शन’ या मोहक नृत्यातून रागमाला साकारली. संपदा थिटे यांनी सादर झालेल्या बिलासखानी तोडी, चैती आणि धन्य ते गायनी कळा या संगीत नाटकांच्या नांदीच्या मेलडीने रसिकांची कडाडून टाळी घेतली. विनायक लिमये यांचा “प्रभू नामाचा मी वाणी’ हा अभंग, “आम्ही दैवाचे शेतकरी’ हे गीत आणि लीना परगी यांनी सादर केलेला नट भैरव रागातील “रेणुके अंबे’ हा गोंधळ अश्‍या एका पेक्षा एक सरस रचना रंगमंचावर सादर झाल्या. “जन्मोजन्मी आम्ही भाग्यवंत’ या भैरवीने सांगता झाली.

श्रीरंग कलानिकेतनच्या अध्यक्षा डॉ. नेहा कुलकर्णी, प्रमुख विश्‍वस्त निरुपा कानिटकर, मराठी नाट्य परिषदेचे तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेशराव धोत्रे, विश्‍वस्त सुरेश साखवळकर, उपाध्यक्ष गडसिंग, कलापिनीचे विश्‍वस्त डॉ. अनंत परांजपे यांच्या हस्ते शरदरावांच्या सांगितिक रचनांचा मागोवा घेणाऱ्या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)