ग्रामसेवकांच्या पदभारसाठी बीडीओंच्या दालनात ठिय्या

बाभूळगाव ग्रामस्थांकडून अधिकाऱ्यांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण : दोन दिवसांत कार्यवाहीचे आश्‍वासन

रेडा – इंदापूर तालुक्‍यातील बाभूळगाव ग्रामसेवकाच्या पदभार देण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी इंदापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दालनासमोर ठिय्या मांडला. तसेच अधिकाऱ्यांच्या मोकळ्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करीत संताप व्यक्‍त केला. याच आंदोलनाची दखल घेत अवघ्या एका तासात नवीन ग्रामसेवकाकडे पदभार देण्याची अंमलबजावणी दोन दिवसात केली जाईल, असे आश्‍वासन प्रशासनाने आंदोलककर्त्यांना दिला. त्यामुळे आंदोलन तत्काळ बंद करून कामकाज सुरळीत झाले.

बाभूळगाव ग्रामसेवकाची बदली झाल्याचा आदेश पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी काढला होता. परंतु चार्ज देण्याची प्रक्रिया झाली नसल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्‍त केला. पंचायत समितीच्या आवारात बेमुदत उपोषणाला हे नागरिक बसले. राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, किसनराव जावळेंसह पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, प्रदीप काळे यांनी आंदोलकांना पाठिंबा देत ग्रामसेवक बदलीचा चार्ज तात्काळ द्यावा, अशी मागणी केली.

सहा गट विकास अधिकारी विनायक गुळवे यांना गावकऱ्यांनी लेखी निवेदन यासंदर्भात दिले. परंतु गटविकास अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या कार्यालयातील मोकळ्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून बोंब मारत संताप व्यक्‍त केला. पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप यांनी आंदोलनकर्त्यांशी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे आंदोलनाची माहिती पोहचली. त्यांनी इंदापूर पंचायत समितीशी संपर्क करून ग्रामसेवकांचा चार्ज तात्काळ करण्यात यावा, जीएस खरमाटे यांच्याकडे हा चार्ज तात्काळ देण्यात यावा, असे आदेश भ्रमणध्वनीवर दिल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.

यावेळी महारुद्र पाटील म्हणाले की इंदापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांचा कारभार मनमानी सुरू आहे. जिल्हा परिषदेने इंदापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची बदली केली नाही तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी राष्ट्रवादीचे संजय देवकर, पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे, पंचायत समिती सदस्य प्रदीप काळे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश शिंदे, भटक्‍या विमुक्तांचे नेते तानाजीराव धोत्रे, अनिल काळे, राजाराम सागर, औदुंबर जाधव, निलेश जाधव, रवींद्र यादव, दत्तात्रय हजारे, एकनाथ शिंदे, सागर राखुंडे, रामभाऊ देवकर, संभाजी टिपले, सतीश देवकर, रंज्या काळे, संगीता काळे, शरद काळे, इंद्रावती काळे, दत्तात्रय गुरगुडे, चरण देवकर, सागर गुरगुडे, लक्ष्मण रेडेकर, शेषराव काळे उपस्थित होते.

कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची तात्काळ बदली करावी, त्यांच्या कारभाराला वैतागून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंचायत समितीचे सदस्य प्रदीप काळे यांनी पक्षाकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन पाठवले आहे. त्यांच्यावर कारवाई करून तात्काळ बदली करावी, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)