पीक विम्यापासून ‘बटाटा’ पोरका

उदासीन राजकीय, प्रशासकीय धोरणाचा पिकास फटका : हमीभाव देऊन योजनेत समावेश करण्याची मागणी

पाईट – राज्यात सर्वाधिक बटाटा पुणे जिल्ह्यात पिकविला जात असला तरी जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय उदासीन धोरणामुळे आजही बटाटा पीक विमा योजनेपासून पोरका आहे. खरीप हंगामातील सर्वाधिक भांडवल आणि अविश्‍वासक असणाऱ्या बटाटा पिकाला खऱ्या अर्थाने पिकविम्याची अतिशय गरज आहे. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही शासन याबाबत कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने बटाटा पिकाला पीक विम्याचे कवच लाभणार का? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

खेड तालुक्‍यात पूर्व-पश्‍चिम भागाबरोबरच आंबेगाव तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात बटाटा पीक घेतले जात आहे. बटाटा वाणामध्ये कुफरी ज्योती, कुफरी चंद्रमुखी, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी, एरटेल अशा जातींच्या वाणांची शेतकरी निवड करतात. पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने कुफरी ज्योती व एरटेलची लागवड केली जाते. थंड वातावरणात या पिकाची चांगल्या पद्धतीने वाढ होत असल्याने जास्तीत जास्त खरीप हंगामात या पिकाची लागवड केली जाते; परंतु सर्वांच्या नित्याच्या आहारात बटाट्याला दुय्यम वागणूक मिळत असून आपल्या अस्तित्वाने सर्वांचे लक्ष केंद्रित करून घेणाऱ्या बटाट्याला पिकविम्यात समाविष्ट करून न घेतल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामात पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, नागपूर इत्यादी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे शासनाने बटाटा पिकाला हमीभाव देऊन त्याचा पिकविम्यामध्ये समावेश करावा अशी बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.

दरवर्षी 145 कोटींपेक्षा अधिक उलाढाल
खेड तालुक्‍यात पूर्व-पश्‍चिम भागाबरोबरच आंबेगाव तालुक्‍यात दरवर्षी 21 हजार एकर क्षेत्रावर लागवड होते. बटाट्याचे बियाणे 2200 ते 2300 रुपये क्विंटल दराने खरेदी करावे लागत असून, खते, फवारणीच्या औषधांचा एकरी 60 ते 65 हजार रुपये खर्च येत असल्याने एकंदरीत 145 कोटीपेक्षा अधिक उलाढाल होत असते.

निसर्ग, व्यापाऱ्यांच्या लहरीपणामुळे शेतकरी कुटुंबाची फरफट
खरीप हंगामात बटाटा पिकावरच शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था अवलंबून असते. बटाटा पिकाचे उत्पादन हे निसर्गाच्या लहरीपणामुळे अनिश्‍चित स्वरूपाचे असून बदलत्या हवामानानुसार विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत आहे. त्यात प्रामुख्याने करपा, खोडकीड, उणी, तांबेरा, खोक्‍या रोग, मावा, तुडतुडे, नाकतोडा, पतंग यांचा समावेश होतो. तर बदलत्या हवामानामुळे दाट धुकं पडल्याने रोपांच्या पानांची मोठ्या प्रमाणात गळती होते. वाऱ्यामुळे रोपे उन्मळून पडतात. या अशा प्रकारच्या प्रकोपामुळे वारंवार फवारण्या कराव्या लागतात किंवा फवारणी करूनही उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. तशातच मालाला चांगला भाव मिळावा यासाठी दलाल व व्यापारी यांच्या लहरीपणावर अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दडपला जात असल्याने त्याच्या कुटुंबाला अठरा विश्‍व दारिद्य्राचा सामना करावा लागत आहे.

खरीप हंगामात बटाटा पिकावरच आमची उपजीविका असून हे पीक पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्याने शासनाने बटाटा पिकास हमी भाव देऊन पिकविम्यामध्ये समाविष्ट करून घ्यावे.
-देविदास बांदल, बटाटा उत्पादक शेतकरी, कासारी


खऱ्या अर्थाने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हमीभाव व पीकविमा देण्याबरोबरच विभागानुसार कोल्ड स्टोरेजची निर्मिती करावी.
-बाळासाहेब मांदळे, कृषी अधिकारी, खेड तालुका

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)