शेवगाव -स्टॉक पडताळणी अहवाल सादर न करणाऱ्या व मुळ परवानाधारकाऐवजी अनधिकृतपणे दुकान चालवण्यास देणाऱ्या शहरातील पाच स्वस्त धान्य दुकानातील दहा जणांवर शासनाची फसवणूक केल्याची फिर्याद प्रभारी तहसीलदार मयुर बेरड यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दि. 24 एप्रिल रोजी शहरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक- 2, 3, 6, 8, 10 यामध्ये तपासणी करुन ती सील केली होती. त्यावेळी दुकानांमध्ये करोना विषाणु अनुषंगाने मोफत उपलब्ध करुन दिलेल्या गहू व तांदुळ या धान्याच्या शिल्लक साठ्यामध्ये तफावत आढळून आली. तसेच साठा पडताळणी अहवाल सादर न करणे, तपासणी दरम्यान बहूतांश स्वस्त धान्य दुकानावर मुळ परवानाधारकाव्यतिरिक्त कायदेशीर ठराव नसलेली अनधिकृत त्रयस्त व्यक्ती दुकान चालवित असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे शहरातील दुकान क्रमांक 2 मध्ये आंबादास नामदेव खंडागळे, दुकान क्रमांक 3 मध्ये ओमप्रकाश गणपतराव कवडे, दुकान क्रमांक 6 मध्ये डी.बी.बिहाणी, प्रकाश एच. गजभिव, बाबासाहेब नाईक, प्रितम नाईक, श्यामसुंदर धुत, गोपाळ धुत, संदिप मुरलीधर धुत , दुकान क्रमांक 8 मध्ये प्रकाश एच गजभीव, दुकान क्रमांक 10 मध्ये रंजना प्रकाश सुतार (सर्व रा. शेवगाव) अशा दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत.