पुणे – महात्मा गांधी यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान संस्थेचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, यासाठी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांच्यासह कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केला. मात्र, पोलिसांकडून टाळाटाळ झाली, असा आरोप करत याप्रकरणात न्यायालयाने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी ऍड. असीम सरोदे न्यायालयात केली.
ऍड. सरोदे म्हणाले, “महात्मा गांधी यांच्याबाबत अनेक पुस्तके असताना देखील मनोहर भिडे यांनी दुर्लक्षित पुस्तक शोधून काढून नाट्यमय पद्धतीने त्याची सर्वांसमोर मांडणी केली. गांधी तसेच त्यांची आई यांच्या चारित्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केली गेली. त्यामुळे याबाबत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. अशा व्यक्तीबाबत, त्यांच्या परंपरा तसेच वंशावळीसंदर्भात आव्हान दिले गेले, असे ऍड. सरोदे यावेळी म्हणाले.