नगर – जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्यानंतर विषय समित्यांच्या निवडीही बिनविरोध पार पडतील हे निश्चित होते. कारण महाविकासआघाडीतील चारही पक्षांना चार समित्यांना देण्याचा निर्णय झाला होता.
मात्र या पक्षातंर्गत असलेले इच्छुक व या चारही पक्षांचा अर्थ-बांधकाम समितीवर असलेला डोळा यामुळे अर्ज माघारीपर्यंत रस्सीखेच सुरुच होती. यातून अर्थ व बांधकाम समिती कळीचा मुद्दा ठरला आहे कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्ष या महाविकास आघाडीतील चारही पक्षांना चार समित्या देण्याचा निर्णय हा अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळीच ठरला होता.मात्र,कोणत्या पक्षाला कोणती समिती व ती कुणाला यावर एकमत करताना मोठी कसरत करावी लागत होती.
कॉंग्रेसला समाजकल्याण,कॉग्रेसला महिला बालकल्याण,सेनेला अर्थ-बांधकाम व क्रांतिकारी शेतकरी पक्षाला कृषी पशुसंवर्धन असे वाटप झाल्याची चर्चा होती. पण अर्थ व बांधकाम समितीसाठी चारही पक्षाने हट्ट केल्याने गेल्या आठ दिवसांपासून तिढा सुटत नव्हता. आज आणि काल दोन दिवस टिळक रोडवरील हॉटेल राज पॅलेसमध्ये बैठकांचा सिलसिला कायम होता. राष्ट्रवादी या समितीसाठी आग्रही होती.
पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या हितासाठी दोन पावले मागे घेत समाजकल्याण समितीवर समाधान मानण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले.मग कॉंग्रेसचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे या समितीसाठी हटून बसले. अजय फटांगंरे.रामहरी कातोरे यांच्यासाठी ते आग्रही होते. त्यांच्या संगमनेर तालुक्याला अपेक्षेप्रमाणे महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद मिरा शेटे यांच्या रूपाने देण्यात आले.
शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्ष महाविकास आघाडीत एकत्र आहे व त्यांची युती पण आहे तरीही त्यांचा अर्थ-बांधकाम समितीवर डोळा होता. शिवसेनेचे काशिनाथ दाते व शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे सुनील गडाख यांची अर्थ व बांधकाम आणि कृषी व पशुसंवर्धन समिती पदावर निवड झाली आहे. मात्र आता यातील कोणती समिती कुणाला याचा अजूनही नकक्की निर्णय झालेला नाही.
विखेंची पुन्हा नाराजी
माजी अध्यक्षा शालिनीताई विखे या तांत्रिकदृष्ट्या अजूनही कॉंग्रेसमध्ये आहेत पण आता कॉंग्रेसमध्ये सबकुछ थोरात गट असल्यामुळे विखे गटाला कुणी विश्वासात घेत नाही. शालिनीताई यांनी ती नाराजी राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांच्याशी बोलताना स्पष्ट केली. त्यावेळी युवक कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष सत्यजित तांबे शेजारी उभे होते. विखे यांचा कल तांबे यांच्याकडेच होता. आम्हाला विश्वासात घेत नाहीत व मग व्हीप कशाला बजावता असा सवाल शालिनीताई यांनी व्यक्त केला.
पारनेरला तिसऱ्यांदा कृषी समिती?
शिवसेनेचे काशिनाथ दाते यांना अर्थ व बांधकाम समिती मिळणार असल्याची चर्चा असली तरी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे गटनेते सुनील गडाख या समितीचे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे अध्यक्षा राजश्रीताई घुले ही संधी कुणाला देतात ते समजेलच. दाते यांना कृषी समिती दिल्यास पारनेरला मधुकर उचाळे, बाबासाहेब तांबे व आता दाते अशी तिसऱ्यांदा संधी मिळेल. यापूर्वी पारनेरला शंकुतला खिलारी यांच्या रूपाने महिला बालकल्याण समिती तर सुजीत झावरे यांच्या माध्यमातून उपाध्यक्षपद मिळालेले आहे.
औटींचा आग्रह अन् लंकेंची नकारघंटा
पारनेरचे काशिनाथ दाते यांचे नाव कुठेही चर्चेत नव्हते. मात्र कालपासून विधानसभेचे माजी उपसभापती विजय औटी यांनी दाते यांच्यासाठी आपले राजकीय वजन वापरले. त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिवसेना उपनेते अनिल देसाई यांच्या माध्यमातून दाते यांचे नाव निश्चित केले. त्यामुळे अनिल कराळे व संदेश कार्ले यांची संधी हुकली. दाते यांचे नाव निश्चित होत असताना त्यांच्या नावाला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी विरोध केला. औटी गटाचे यामुळे पुन्नजीवन होईल ही भिती त्यांना आहे. त्यातून महिला बालकल्याण समितीसाठी त्यांच्या पत्नी राणीताई लंके यांचा अर्ज दाखल केला पण तो पक्षादेशाने मागे घेण्यात आला.