“दिल्लीगेट’प्रश्‍नी ठेकदारास व्यक्तिश: जबाबदार धरणार

सार्वजनिक बांधकाम विभागाची नोटीस; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची तंबी

नगर  (प्रतिनिधी) – शहरातील सर्वाधिक रहदारी असलेल्या न्यू आर्टस कॉलेज ते दिल्लीगेटपर्यंतच्या रस्त्याचे जलनिस्सारण व्यवस्थेसह रस्ता कॉंक्रीटीकरणाचे काम युद्ध पातळीवर हाती घ्यावे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यात काम पूर्ण न झाल्याने एखादी अनुचित घटना घडल्यास त्यास रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास व्यक्तिश: जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ठेकेदारास देण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अ. भा. भोसले यांनी ही नोटीस बजावली आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार काम करावे, असेही सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सूचित करण्यात आलेले आहे. नगर शहराचे उत्तरेकडील प्रवेशद्वार असलेल्या दिल्लीगेट रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळा तोंडावर आहे. अशावेळी या बाजुने प्रवेश करताना सावेडी उपनगरात वाहतूक आणि पाणी कोंडींचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्या संदर्भात कॉंग्रेस पक्षाच्या महापालिकेतील गटनेत्या सुप्रिया जाधव व माजी नगरसेवक ऍड. धनंजय जाधव यांनी महापालिका आयुक्तांचे याकडे नुकतेच लक्ष वेधले होते.

त्यासंदर्भात कामाचा ठेका देण्यात आलेल्या ठेकेदारास नोटीस बजावली असल्याची माहिती प्रशासनातर्फे जाधव यांना देण्यात आली. तसेच हे काम गतीने करण्यासंदर्भात निर्देशित करण्यात आले असल्याचेही प्रशासनातर्फे जाधव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

न्यू आर्टस कॉलेज ते निलक्रांती चौक दरम्यान रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तथापि, रस्त्याची साफसफाई बाकी असल्याने तो अजून वापरात नाही. रस्त्याच्या दुतर्फा नाल्याचे कामही मंजूर आहे. मात्र, त्यास अजून सुरुवात झालेली नाही. या भागात पावसाचे पाणी हमखास साचते. परिणामी भविष्यात येथे वाहतूक कोंडीतून धोका संभवतो, अशी भूमिका जाधव यांनी मांडली होती. त्या संदर्भात सुरु असलेल्या पाठपुराव्याची माहिती प्रशासनाकडून जाधव पती-पत्नीला देण्यात आली आहे.

दिल्लीगेट परिसर नेहमीच वाहतूक आणि पाणी कोंडीचाही बळी ठरतो. म्हणूनच या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासाठी पाठपुरावा केला. आता येथील काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. मात्र, किरकोळ दुरुस्तीअभावी पुन्हा अनुचित घटनांचाच सामना करण्याची वेळ येण्याची भीती आहे. तसे होऊ नये म्हणून हा पाठपुरावा सुरु आहे.
सुप्रिया जाधव, गटनेत्या, कॉंग्रेस पक्ष, महानगरपालिका.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.