वाघोली, (प्रतिनिधी) – फोनवरून दुकानदाराकडून माल खरेदी करून बांधकाम ठेकेदाराला होलसेलमध्ये स्टीलचा माल पुरविण्याचे आमिष दाखवून बांधकाम ठेकेदार व दुकानदाराची 1 लाख 20 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी इसमावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी सांडस येथे घडली.
पिंपरी सांडस येथील बांधकाम साइटवर एक अनोळखी व्यक्ती गेल्यावर ठेकेदार चंद्रशेखर कोतवाल यांचा नंबर कामगारांकडून घेतला. ठेकेदार कोतवाल यांना फोन करून होलसेलमध्ये स्टीलचे मटेरियल विकत असल्याचे सांगितले. कोतवाल यांनी 1 लाख 60 हजारांच्या मालाची ऑर्डर संबंधित इसमाला दिली.
दुसर्या दिवशी माल आल्यानंतर इसमाने मालाचे पैसे टेम्पो चालकाला न देता मला द्या, असे म्हणून 1 लाख 20 हजार रुपये घेतले आणि निघून गेला. संध्याकाळी त्याच मालाचे पैसे घेण्यासाठी चालक पुन्हा आला असता ठेकेदाराने पैसे संबंधित व्यक्तिला दिले असल्याचे सांगितले. दुकानदार शेखर धुमाळ यांनी पैसे मिळाले नसल्याचे ठेकेदाराला सांगितल्यानंतर संशय बळावला.
एकाच व्यक्तीने एकाच फोन नंबरवरून दुकानदार धुमाळ यांच्याकडून माल घेऊन ठेकेदार कोतवाल यांना विकला व मिळालेले पैसे घेऊन फरार झाल्याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.