कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील कान्हे फाटा येथे असलेले पोलीस मदत केंद्र गेले कित्येक वर्षापासून बंद असून ते धूळ खात पडलेले आहे. त्यामुळे पोलीस मदत केंद्र फक्त नावापुरतेच शिल्लक राहिले असून ते पुन्हा कार्यान्वीत करण्याची मागमी नागरिकांनी केली आहे.
पोलीस मदत केंद्र बंद असल्याने कान्हे गावासह अंदर मावळातील ५० गावांच्या अडचणी निर्माण झाली आहे. पुणे – मुंबई महामार्ग लगत असलेल्या कान्हे गाव येथे काही वर्षांपूर्वी पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आले होते.
ते आता बंद असल्याने कान्हे गावसह अंदरमावळातील नागरिकांना तक्रारीसाठी पदर मोड करून वडगाव पोलीस ठाण्यात जावे लागते. कान्हे गाव हे अंदर मावळचे मुख्य केंद्रबिंदू आहे. कान्हे गावात औद्योगिकीकरण मोठ्या झपाट्याने वाढत आहे.
या भागामध्ये ३० ते ४० कंपन्या आहेत. तर, अंदर मावळात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे या भागात पर्यटकांची मोठी गर्दी असते. या भागात विविध कारणावरून गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे कान्हे फाटे येथील पोलीस मदत केंद्र सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.