मनिला – जगातील सर्वच देशांमध्ये खरेदी व्यवहारांसाठी पैशाचा म्हणजेच चलनांचा वापर केला जातो; पण काही वेळेला मात्र वस्तू स्वरूपात सुद्धा देवाण-घेवाण करून खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात. फिलिपिन्समध्ये नुकत्याच एका आदर्श उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी कांद्याचा वापर चलनासारखा करण्यात आला.
फिलिपिन सरकारच्या फूड बॅंक योजनेच्या निधीसाठी एक दिवस खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये कांद्याचा वापर करण्यात आला. राजधानी मनीला शहरातील अनेक डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये आणि मॉलमध्ये खरेदी-विक्री करत असताना पैशाच्या ऐवजी कांद्याचा स्वीकार करण्यात आला. या उपक्रमातून जे कांदे जमा होणार आहेत त्यांची विक्री करून त्यामधून मिळणाऱ्या पैशाचा वापर फूड बॅंक योजनेसाठी करण्यात येणार आहे. फीलिपिन्समध्ये करोना महामारीच्या काळामध्ये ही योजना सुरू करण्यात आली.
या योजनेअंतर्गत शहरात ठीकठिकाणी छोट्या टपऱ्या उभ्या करून तिथे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात येतात. ज्या लोकांना पैसे देऊन आपली अन्नाची गरज भागवणे शक्य नाही, अशा लोकांसाठी या ठिकाणी मोफत स्वरूपात खाद्य उपलब्ध करून दिले जाते. फिलिपिन्समध्ये सर्व भाज्यांच्या तुलनेत कांद्याचे दर सर्वात जास्त असल्याने या योजनेसाठी चलन म्हणून कांद्याचा वापर करण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून फिलिपिन्स सरकारने शेतकऱ्यांना कांद्याचे पीक घेण्यासाठी ही प्रोत्साहित केले आहे.