संकल्पना पर्यावरणपूरक श्रीगणेशाची

ज्ञानकर्मेंदिय प्राणगण । याचे करी जो संरक्षण ।
त्या गणपतीचे वंदू चरण । मंगलाचरण हे आमुचे।।
ज्याला म्हणती आंबेचा सुत । कलियुगी तो गंधर्वस्थित ।
जो वरदाभय हस्त । स्मरणे समस्त विघ्नहर्ता ।।
कर्ता धर्ता संहर्ता । विश्‍वाचा जो तारी आर्ता ।
जो स्मरणे दुःख वार्ता । नुरवी भर्ता तो आमुचा ।।

श्री वासुदेवानंद सरस्वती-टेंबेस्वामी यांनी श्रीगणेशाचे केलेले हे वर्णन. गणपती ही बुद्धीदेवता. सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक अधिष्ठाने या श्रीगणेशाला मिळालेली आहे. गणेशोत्सवाचे बीजही पुण्यातच लोकमान्य टिळकांनी रुजवले आणि त्या उत्सवाचे भव्य-दिव्य स्वरूप आता दिसत आहे. शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या आणि पुण्याचे वैभव समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची सुरुवात आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या वर्षी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्सवाचे एक वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे; पण तरी देखील उत्सवाचे पावित्र्य आणि उत्सवाची परंपरा तीच राहणार आहे. याबरोबरच गेल्या काही अलीकडच्या वर्षांत पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना रुजली जात आहे. गणेशमूर्तीच्या घडणीपासून विसर्जनापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये पर्यावरणाचा विचार केला जातो आहे आणि ही सकारात्मक बाब स्वीकारली जात आहे. 

श्री गणेशोपासना ही पूर्वापार आपल्याकडे केली जाते. कोणत्याही कार्यारंभी गणेशवंदना आपल्याकडे महत्त्वाची मानली गेली आहे आणि त्यासाठी सुपारीची किंवा नारळाची स्थापना केली जाते. त्यामागे उद्देश हाच आहे की, या गोष्टींचे विसर्जन करणे सोपे जाते आणि धार्मिक भावही जपला जातो. स्थापना आणि विसर्जन या दोन गोष्टी उत्सवकाळात महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. त्या दृष्टीने विचार करता, श्रीगणेशाची मूर्ती ही सहज, सोप्या पद्धतीने हाताळता येणे आवश्‍यक आहे. त्यामुळेच तिचा आकार आणि विघटन या दोन गोष्टींचा विचार केला जात आहे. आज करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर उत्सवावर काही निर्बंध आले आहेत. किंबहुना प्रशासनाकडूनच आणले गेले आहेत.

 मूर्तीचा आकार, स्थापना आणि विसर्जन मिरवणुका यांवर प्रतिबंध घातला गेला आहे; पण गेल्या काही वर्षांपासूनच या गोष्टींचा स्वीकार व्हावा, यासाठी पर्यावरणवादी संस्थांकडून प्रबोधन केले जात आहे. श्री गणेशमूर्ती बनवताना मातीचा, नैसर्गिक रंगांचा वापर, मूर्ती छोट्या असणे, वृक्ष मूर्ती, सीड मूर्ती, मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषण याबाबतीत प्रबोधन केले जात आहे, या सगळ्याच गोष्टींची समर्पक पर्यावरणाच्या दृष्टीने माहिती आपण पुढील लेखांमध्ये घेणार आहेत. हा उत्सवाचा काळ पावसाळ्यातला आहे, त्या दृष्टीने विचार करता देवाला वाहण्यात येणाऱ्या पत्री, या काळातील रानभाज्या नैवेद्य इथपासून सगळ्याचाच विचार केला जाणार आहे. या काळात निर्माण होणारे निर्माल्य आणि त्यापासून करता येणारे खत हा खरे तर एक उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे. सोसायट्यांमध्ये तर याचे चांगले नियोजन होऊ शकते, त्या दृष्टीनेही लेखांमधून तज्ज्ञांचे विचार येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.