पुणे – पीएमपीची वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी आम आदमी पार्टीने (आप) सुरू केलेल्या बस मित्र संकल्पनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये नागरिक सहभाग घेऊन पीएमपी बसची तपासणी करत आहेत. तसेच यावेळी आढळून आलेल्या त्रुटी पीएमपीला पाठवल्या जात आहेत.
नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, या हेतूने “बस मित्र’ ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. या संकल्पनेनुसार शहरातील जे नागरिक नियमितपणे बस सेवा वापरतात त्यांनाही या बस मित्र संकल्पनेत सहभागी होण्याची विनंती केली होती. या उपक्रमात नागरिकांचा चांगला सहभाग मिळत असून, त्यांनी पाठविलेल्या सूचना, माहिती “आप’मार्फत पीएमपीला पाठविली जात आहे, अशी माहिती आपचे चेंथिल अय्यर यांनी दिली. शहराच्या वेगवेगळ्या भागात फेबियन अण्णा सॅमसन, माधुरी गायकवाड, मिलिंद ओव्हाळ, कुणाल धनवडे, मंजुनाथ मानुरे आणि मोईन पठाण हे पदाधिकारी उपक्रमात सहभागी झाले होते.
या गोष्टींची केली जाते तपासणी…
- बस योग्य स्थितीत आहे का?
- फर्स्ट एड किट, फायर इक्विपमेंट व्यवस्थित आहेत का?
- बसच्या आत मध्ये सीट, हॅंडल्स नीट आहेत का?
- बसचे दरवाजे व्यवस्थित कार्यरत आहेत का?
- बसचा हॉर्न आणि गिअर लिव्हर व्यवस्थित कार्यरत आहे का?
- चालक प्रत्येक बसस्टॉपवर बस उभी करतो का?
- बसमध्ये यूपीआय प्रणाली वापरून तिकीट दिले जात आहे का?