दोन महिला नगरसेवकांसह अनेकजण इच्छुक
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राष्ट्रवादीने इच्छुकांचे अर्ज मागविले आहेत. सत्तेबाहेर असलेल्या या पक्षाकडे एकमेव महत्त्वाचे पद असल्यामुळे पदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या पदावर कोणाला संधी देणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सध्या महापालिकेतील विरोधी पक्षनेते हे एकमेव पद राष्ट्रवादीकडे आहे. या पक्षाचे सभागृहात 36 आणि 2 स्वीकृत असे 38 चे संख्याबळ होते. यापैकी ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने आणि जावेद शेख यांचे करोनाने निधन झाल्यामुळे या पक्षाचे संख्याबळ दोनने कमी होऊन 36 झाले आहे. तीन वर्षांत तीन जणांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली आहे. तर विविध समित्यांसह स्थायी समितीमध्ये काहीजणांना संधी देण्यात आली आहे. मात्र अत्यंत कमी जणांना ही संधी मिळाल्यामुळे ज्यांना आतापर्यंत कोणतीही संधी मिळाली नाही त्यांची संख्या मोठी असल्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा रंगली आहे.
विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी महापौर मंगला कदम आणि वैशाली घोडेकर या दोघीही स्पर्धेत आहेत. तर घोडेकर यांनी हे पद आपल्यालाच मिळावे यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या दोघींशिवाय ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे, राजू मिसाळ व मोरेश्वर भोंडवे हे देखील विरोधी पक्षनेते पदासाठी इच्छुक आहेत. अद्यापपर्यंत या तिघांनीही जाहीर इच्छा व्यक्त केली नसली तरी गतवर्षीच्या विरोधी पक्षनेते निवडीमध्ये अजित गव्हाने आणि राजू मिसाळ या दोघांनी दावा केला होता. तसेच शाम लांडे, संतोष कोकणे हे दोघेही स्पर्धेमध्ये पुढे येण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत स्पर्धा असली तरी अजित पवार हेच अंतिम निर्णय घेणार असल्यामुळे ते कोणाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सभागृहातील भूमिका महत्त्वाची
महापालिकेत भाजपाकडून सत्तेचा गैरवापर सुरू असतानाही राष्ट्रवादी मात्र यावर आवाज उठवित नसल्यामुळे या भ्रष्टाचाराला राष्ट्रवादीचीही मूकसंमती असल्याचाच संदेश शहरभर गेला आहे. हा संदेश पुसून काढत पक्षाची भूमिका सभागृहात मांडणारा आणि स्वच्छ प्रतिमेचाच विरोधी पक्षनेता देणे राष्ट्रवादीला क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाच्या विरोधात आवाज उठविण्यास आणि पक्षाची प्रतिमा सुधारण्यास मदत होऊ शकते. येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीचा विचार होऊनच विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे.