पुणे – न्यूझीलंडचे प्रसिद्ध क्रिकेट पंच बिली बाऊडेन यांचे इशारे जागतिक क्रिकेटमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले. सभ्य गृहस्थांच्या खेळात पंचांच्या पारंपरिक इशाऱ्यांना मागे टाकत बाऊडेन यांनी आपली एक खास शैली प्रसिद्ध केली. त्याच बाऊडेन यांचा भारतीय अवतार महाराष्ट्रातील पुरंदरमध्ये एका स्थानिक स्पर्धेतील सामन्यातच पाहायला मिळाला. गोलंदाजानी टाकलेल्या वाइड चेंडूवर कॉल देताना चक्क या पंचाने शीर्षासन करत दोन्ही पाय बाजूला घेत वाइडचा इशारा केला. या पंचामुळेच टेनिस चेंडूवर खेळली जात असलेली ही स्पर्धाही लोकप्रिय झाल्याचे दिसून आले.
पुरंदर प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेतील एका सामन्यात एका पंचाने ही अगळीवेगळी कृती करत सहकारी पंच, दोन्ही संघातील खेळाडू तसेच उपस्थित प्रेक्षकांचेही मनोरंजन केले. काही व्यक्तींनी या कृतीचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले व त्यावर अनेक गमतीदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, काही वेळातच त्याला लाखो हिट्स मिळाल्या.
खरेतर क्रिकेटमध्ये गोलंदाजाने चेंडू वाइड टाकला तर गोलंदाजाच्या बाजूकडील पंच दोन्ही हात पसरवतो व इशारा देतो. या सामन्यात मात्र पंचाने आपल्या पायांचा वापर केला. कॉपीबुक क्रिकेटमध्ये हे मान्य केले जात नसले तरी स्थानिक स्पर्धेत या पंचाने मात्र प्रचंड लोकप्रियता तीदेखील काही वेळातच मिळवली.
Surely we need to see this chap join the ICC Elite panel .. 👍🙌🙌 pic.twitter.com/FcugJBgOEn
— Michael Vaughan (@MichaelVaughan) December 5, 2021
इंग्लंडच्या वॉननेही घेतली दखल
या पंचाने केलेली कृती जगभरात पोहोचली हीच सोशल मीडियाची ताकद असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. केवळ सर्वसामान्य व्यक्तीच नव्हे तर इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानेही याची दखल घेत खुमासदार प्रतिक्रिया दिली आहे. या पंचाला आयसीसीच्या पंच पॅनेलमध्ये सहभागी करावे, असे गमतीदार मतही वॉनने व्यक्त केले.