अहमदनगर – सर्वांनी प्रेरणा घ्यावी अशी घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. येथील किशोर ढुस या तरूणाने करोनामुळे विधवा झालेल्या महिलेसोबत लग्न करून आधार देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. विधवा महिलेला नऊ महिन्याचे बाळ आहे. बाळासह किशोर यांनी महिलेला स्विकारले आहे.
“ढूस यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे. कोणत्याही मदतीपेक्षा करोना एकल महिलांना आधाराची गरज आहे. तो आधार किशोर यांनी मिळवून दिला आहे. हे खूप मोठे धाडस असून सर्वांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी,” असे मत तहसीलदार एफ. आर. शेख यांनी व्यक्त केले. रविवारी राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे यांनी किशोर राजेंद्र ढुस यांचा सपत्नीक सत्कार केला. यावेळी शेख बोलत होते.
यावेळी राहुरी अर्बन निधी संस्थेने नव दाम्पत्याचा साडी व कपडे भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेने नऊ महिन्याच्या बालकाच्या नावावर 11 हजार रुपयाची मुदत ठेव ठेवली आहे.