गुरुवारी प्रभाग अध्यक्षांची निवड

केवळ औपचारिकता ः महापालिकेच्या प्रभाग समित्यांवर भाजपचेच वर्चस्व

पिंपरी – लोकसभा निवडणुकांनंतर आता महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू आहे. महापालिकेच्या आठही प्रभाग समित्यांवर पक्षीय बलाबलानुसार भाजपचेच अध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे. परंतु आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपतर्फे शनिवारी (दि. 4) दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज स्विकृतीच्या वेळी प्रत्येक प्रभाग समितीसाठी एका उमेदवाराचा अर्ज भरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यामुळे 9 तारखेला निवडणुकीच्या दिवशी अध्यक्ष निवडीची फक्‍तऔपचारिकता शिल्लक राहणार आहे. शिवसेना किंवा अपक्ष आघाडीला एखाद्या प्रभाग समितीचे अध्यक्षपद देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महापालिका प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी प्रभाग कार्यालयांतून 2 व 3 तारखेला अर्ज वाटप करण्यात आले. तर, 4 तारखेला सकाळी 11 ते 2 या वेळेत अर्ज वाटप होणार आहे. तर, दुपारी 3 ते 5 या वेळेत अर्ज स्वीकृती होईल. प्रत्येक प्रभाग समितीसाठी प्रत्येकी 4 याप्रमाणे पक्षनेता कार्यालयातून आज एकूण 32 अर्ज नेण्यात आले.

9 तारखेला महापालिकेतील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृहात (स्थायी समिती सभागृह) सकाळी 11:30 पासून प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी निवडणुकीला सुरुवात होईल. पुणे महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त राजेंद्र निंबाळकर यांची विभागीय आयुक्‍तांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक होईल. पक्षीय बलाबलानुसार प्रत्येक प्रभाग समितीमध्ये भाजपचेच वर्चस्व आहे. त्याशिवाय, भाजपसमवेत अपक्ष आघाडी देखील आहे. भाजपकडे अपक्ष आघाडीने प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी मागणी केलेली नाही. शिवसेनेची एक ते दोन प्रभाग समित्यांसाठी अध्यक्ष पद मिळावे, अशी पूर्वीचीच मागणी आहे. मात्र, वरिष्ठ स्तरावर याबाबत होणाऱ्या निर्णयावर पुढील गणित अवलंबून असणार आहे.

‘शिवसेनेची एक ते दोन प्रभाग समित्यांसाठी अध्यक्ष पद मिळावे, अशी पूर्वीचीच मागणी आहे. मात्र, वरिष्ठ स्तरावर याबाबत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.’

– राहुल कलाटे, गटनेते, शिवसेना

‘पक्षीय बलाबलानुसार सर्व प्रभाग समिती अध्यक्ष पदावर भाजपलाच संधी मिळणार आहे. समिती अध्यक्ष पदाची नावे पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची चर्चा करून निश्‍चित केली आहेत. शनिवारी ही नावे जाहीर केली जाणार आहेत. शिवसेना किंवा अपक्ष आघाडीला प्रभाग समिती अध्यक्ष पद देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.’

– एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेते

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.