पुणे-पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय हे “भ्रष्ट’ कारभारात सतत अव्वल स्थानीच असते. यात कार्यालयाचे विभागीय शिक्षण उपसंचालक हे पद म्हणजे “काटेरी’ मुकूटच मानले जाते. आता हा मुकूट शालेय शिक्षण विभागाने राजेंद्र अहिरे यांच्याकडे सोपविला आहे. कार्यालयात “नवा गडी, नवा राज’ अशी अवस्था निर्माण होणारच आहे.
दरम्यान आता नव्या विभागीय शिक्षण उपसंचालकापुढे “भ्रष्ट’ कारभार मोडीत काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांना अडीच वर्षे पूर्ण होत असतानाच त्यांची औरंगाबाद येथील महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेच्या शिक्षण उपसंचालकपदी प्रशासकीय कारण पुढे करुन विभागीय संवर्ग बदलून बदली करण्यात आली. उकिरडे यांच्या जागी नाशिक बोर्डाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांची वैद्यकीय कारणास्तव विभागीय संवर्ग बदलून बदली करण्यात आली आहे. वास्तविक अहिरे यांची मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकपदी बदली होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, अचानक काही मोठ्या “गडबडी’ झाल्याने अहिरे यांच्या गळ्यात ऐनवेळी पुण्याची माळ टाकण्यात आली.
अधिकारी, कर्मचारी “एसीबी’च्या रडारवर
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय हे “क्रिमी’ कार्यालय म्हणूनच ओळखले जाते. या कार्यालयात नियुक्ती मिळावी म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा लागण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून आहे. या कार्यालयात काम करणारे बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी उत्पन्न स्त्रोतापेक्षा अधिकची संपत्ती मिळवत श्रीमंतीचा थाटही लाटत असतात. कार्यालयात व आवारात सतत “बाजार’ भरल्यासारखी गर्दीच पहायला मिळते. काही शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी, एजंट नेहमीच तळ ठोकून बसलेले असतात. रात्री उशिरापर्यंत व सुट्टीच्या दिवशीही कार्यालयाचे कामकाज करण्याची सवयच अधिकारी, कर्मचाऱ्यांना लागलेली आहे. या कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचारी “एसीबी’च्या रडारवरही आहेत.
कामे वेळेत मार्गी लागत नाही…
शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यता, संच मान्यता, सांकेतांक क्रमांक, विषय मान्यतांसह अन्य विविध कामांसाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सतत हेलपाटे मारत असतात. कामे वेळेत व मुदतीत कधीच मार्गी लागत नाही. काही अधिकारी, कर्मचारी वर्षानुवर्षे याच कार्यालयात ठराविक काही टेबलचे कामकाज पाहत असून यांची मक्तेदारी खुपच वाढलेली असून ती मोडीत काढण्यासाठी गेल्या काही वर्षांत एकाही विभागीय शिक्षण उपसंचालकांला यश मिळालेले नाही. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे आपापसात फारसे पटतही नसल्याने त्याचा कामकाजावर विपरीत परिणाम होत असतो.
पॅटर्नबाबत उत्सुकता
कार्यालयातील अनागोंदी कारभार, अस्ताव्यस्तपणा, चालढकलपणाची वृत्ती, वाढती एजंटगिरी या सर्व कारभाराला लगाम घाण्यासाठी आता नवे विभागीय शिक्षण उपसंचालक अहिरे हे कामकाजाचा कोणता “विशेष’ पॅटर्न राबविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.