नेवासा – नेवासा आगाराच्या वतीने एसटीला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल लालपरीचा पुष्पहार घालून व पूजन करून अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून व गुलाबपुष्प देऊन एसटीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांसह आता महिलांना देखील प्रवास भाड्यात पन्नास टक्के सूट देणारी लालपरी ही सर्वसामान्य माणसांची सुरक्षित अशी जीवनदायिनी बनली असल्याने एसटीने प्रवास करून तिचा सन्मान वाढूया, असे आवाहन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव ताके पाटील यांनी केले.
नेवासा बसस्थानकात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव ताके पाटील अध्यक्षस्थानी होते. पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, आगार व्यवस्थापक ज्ञानदेव मगर, प्रवाशी संघटनेचे सचिव पत्रकार सुधीर चव्हाण, पोलीस हवालदार तुळशीराम गिते, बसस्थानक प्रमुख किरण शिंदे, आगार लेखाकार मोहन मोरे, राकेश सोनवणे, पोलीस मित्र बाळू जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
उपनिरीक्षक ढाकणे म्हणाले की, एसटीने आतापर्यंत विद्यार्थ्यांना देखील सेवा दिल्याने त्यांची शिक्षण पूर्ण होऊन तेच विद्यार्थी आज उच्चपदावर कार्यरत असून ही लालपरीचीच कृपा असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या विकासात एसटीचे मोठे योगदान असल्याचे सांगून शुभेच्छा दिल्या. एसटी महामंडळाच्या आस्थापना विभागाचे अधिकारी वासुदेव आव्हाड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आगार व्यवस्थापक ज्ञानदेव मगर यांनी प्रास्ताविक केले उपस्थित मान्यवरांचा व प्रवाशांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
सर्वांना पेढे वाटून एसटीचा 75 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. चालक व वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील एसटीच्या आगारातही वर्धापनदिन पेढे वाटून, चालक व वाहकांना गुलाबपुष्प देऊन साजरा करण्यात आला.